नऊ महिन्यात फक्त २ टक्केच काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:54+5:302021-07-14T04:09:54+5:30
वसीम कुरेशी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामठी रोडवर एलआयसी चाैक ते ऑटाेमाेटिव्ह चाैकापर्यंत ५.३ किलोमीटरचे निर्माणाधीन डबलडेकर फ्लायओव्हरच्या ...
वसीम कुरेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी रोडवर एलआयसी चाैक ते ऑटाेमाेटिव्ह चाैकापर्यंत ५.३ किलोमीटरचे निर्माणाधीन डबलडेकर फ्लायओव्हरच्या संथगतीने सुरू झालेल्या कामाचा वेग अद्यापही वाढलेला नाही. ८२ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा होत आहे. असाच दावा ऑक्टोबर-२०२० मध्येही करण्यात आला होता. प्रत्यक्षात तेव्हा ८० टक्के काम होणे बाकी होते. आता डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.
मेट्रोच्या रिच-टू अंतर्गत कामठी रोडवरील एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत ५.३ किमी लांबीच्या निर्माणाधीन डबलडेकर फ्लायओव्हरचे काम ८२ टक्के पूर्ण झाल्याचे अलीकडेच एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातूृन सांगण्यात आले होते. ७ सप्टेंबर २०२० रोजी हे काम ७८ टक्के झाल्याचे सांगण्यात आले होते, त्यानंतर ऑक्टोबर-२०२० मध्ये काम ८० टक्के पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते. अर्थात मागील नऊ महिन्या रिच-टू मध्ये फक्त २ टक्के काम झाले होते. सप्टेंबर ते ऑक्टोबर या एक महिन्यात कामाचा वेग २ टक्क्यावरच होता, असे यावरून दिसत आहे.
आता उर्वरित काम डिसेंबर-२०२१ पर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगितले जात आहे. यासाठी पाच महिन्याचा काळ उरला आहे. अद्याप कामठी रोडवर गुरुद्वाराजवळ तीन लेव्हलमध्ये उभारल्या जाणाऱ्या स्ट्रक्चरचे कामही झालेले नाही. मागील १० महिन्यात ७२ गर्डर उभारल्याची माहिती महामेट्रोने दिली आहे.
नोव्हेंबर-२०१७ मध्ये डबलडेकर फ्लायओव्हरचे कंत्राट मिळवून काम सुरू झाले होते. हे काम सुरू असतानाच रिच-फोर आणि रिच-थ्रीचे काम पूर्ण झाले. आधी येथून फक्त फ्लायओव्हर करण्याचेच ठरले होते, नंतर मेट्राे प्रकल्पासोबत या कामाचे एकत्रीकरण झाले. प्रकल्प २०१८ मध्ये आखण्यात आला. २०१९ मध्ये एनएचएआयची मंजुरी आणि निधी मिळाला, असे सांगितले जाते.
...
प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे
- ५७३ कोटी रुपये खर्चाचा हा डबलडेकर प्रकल्प नोव्हेंबर-२०१७ मध्ये सुरू झाला.
- २८ महिन्यात पूर्ण होणारा हा प्रकल्प ४५ महिन्यानंतरही अपूर्णच आहे.
- लाॅकडाऊनदरम्यान काम बंद असतानाही आता दर रविवारी काम बंद असते.
- पाच महिने शिल्लक असताना अद्याप गुरुद्वाराजवळील आरयूबीवरील कामाला सुरुवातच नाही.
- एलआयसी चाैकत गिरीश हाईट्ससमोरील पुलाच्या लेव्हल एकचे काम अपूर्ण. आरयूबीच्या कामाला रेल्वेकडून विलंब.
- रस्त्याच्या कामाला सुरुवातच नाही. एलआयसी चाैक ते गुरुद्वारापर्यंत मार्गाची चाळणी.
- एलआयसी चाैकाजवळ पुलाच्या लँडिंग पाॅईंटवरील मार्गाचे रुंदीकरण बाकी.
...
कोट
आरयूबीच्या भागातील कामात विलंब झाला आहे. येथे रेल्वेकडून काम सुरू होते. एलआयसी चाैकाच्या बाजूला लँडिंग पॉईंट नंतर ठरविण्यात आला होता. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल.
- बृजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्राे
...