‘पीएचडी’ नोंदणीसाठी केवळ २९१ अर्ज
By Admin | Published: January 18, 2017 02:22 AM2017-01-18T02:22:24+5:302017-01-18T02:22:24+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’चे दोन अवघड टप्पे
नागपूर विद्यापीठ : ‘पेट’मध्ये यशस्वी ठरलेल्यांची नोंदणीकडे पाठ
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’चे दोन अवघड टप्पे पार करताना अनेकांची दमछाक झाली. मात्र हे टप्पे पार केल्यानंतरदेखील अनेक उमेदवारांनी नोंदणीकडे पाठच फिरविली. नोंदणीसाठी २९१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे.
प्रथम वस्तुनिष्ठ ‘आॅनस्क्रीन’ परीक्षा व त्यानंतर पात्र ठरल्यास लेखी परीक्षा या दोन टप्प्यांत ‘पेट’ होणार झाली. ‘पेट’च्या पहिल्या टप्प्यासाठी ३७७१ उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र पाठविण्यात आले. यापैकी ३४४८ उमेदवारांनीच परीक्षा दिली व त्यातील ८९७ म्हणजेच सुमारे २६ टक्के परीक्षार्थी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरले होते. यातील ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. १६ जानेवारीपर्यंत या उमेदवारांना नोंदणीसाठी ‘आॅनलाईन’ अर्ज करायचे होते. शिवाय न्यायालयाच्या निर्णयानंतर अगोदर ‘पेट’ उत्तीर्ण झालेले उमेदवारदेखील नोंदणी करू शकणार होते. यापैकी केवळ २९१ उमेदवारांनीच प्रत्यक्षात ‘आॅनलाईन’ अर्ज केले आहेत, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. २० तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज व कागदपत्रांची ‘हार्ड कॉपी’ सादर करायची आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रियेतील उमेदवारांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
अभियांत्रिकीच्या उमेदवारांचे जास्त प्रमाण
साधारणत: ‘पीएचडी’शाठी कला व विज्ञान शाखेतील उमेदवारांचा सर्वात जास्त कल असतो असा समज आहे. मात्र अभियांत्रिकीच्या उमेदवारांनी हा समज खोडून काढला. अभियांत्रिकीच्या ८२ उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. त्याखालोखाल विज्ञान (६४) व वाणिज्य (६०) शाखेत अर्ज आले आहेत.