नागपुरात ४० टक्केच औषध साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:05 AM2019-06-03T10:05:58+5:302019-06-03T10:08:14+5:30

विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला लागलेल्या आगीच्या घटनेने औषध बाजार बंद राहिल्याने औषधी दुकानांमध्ये ४० टक्केच औषधांचा साठा असल्याचे सांगितले जात आहे.

Only 40 percent of the drug stocks in Nagpur | नागपुरात ४० टक्केच औषध साठा

नागपुरात ४० टक्केच औषध साठा

googlenewsNext
ठळक मुद्देऔषध बाजार बंदचा फटकारुग्ण अडचणीत येणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीच्या घटनेने ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तब्बल तीन दिवस बाजार बंद राहिल्याने औषधी दुकानांमध्ये ४० टक्केच औषधांचा साठा असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारपासून बाजार पूर्ववत न झाल्यास रुग्ण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
शहरच नाही तर संपूर्ण विदर्भाला औषधांचा पुरवठा करणारे नागपुरात ३०० हून अधिक ठोक विक्रेते आहेत. गांधीबाग येथे १५० तर संदेश औषध बाजारातही एवढीच दुकाने आहेत. गुरुवारी रात्री संदेश औषध बाजाराला लागलेल्या भीषण आगीत बहुसंख्य दुकानांना झळ पोहोचली. सुमारे दीडशे कोटींची औषधे आगीत नष्ट झाल्याचे बोलले जाते. या घटनेवर ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने शुक्रवारपासून संदेशसोबतच गांधीबाग औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या ठोक विक्रेत्यांकडूनच किरकोळ औषधी दुकानांना सामान्यसोबतच महागडी औषधे वेळेवर उपलब्ध होत होती. परंतु तीन दिवस संदेश बाजार बंद असल्याने याचा फटका या दुकानांसोबतच रुग्णांना बसत आहे. धंतोली, रामदासपेठ व वर्धा रोडवरील औषध दुकानदाराने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले. संपूर्ण शहराला संदेश बाजारामधून ७५ टक्क्यांवर औषधांचा पुरवठा व्हायचा. हा बाजारच बंद पडल्याने दुकानात केवळ ४० टक्के व त्यापेक्षाही औषधांचा साठा कमी उरलेला आहे. विशेषत: जी दुकाने चार-पाच स्ट्रीप्ससाठी या बाजाराला फोन करून आॅर्डर द्यायचे, ते अडचणीत आले आहेत. सोमवारपासून हा औषधांचा बाजार सुरू न झाल्यास परिस्थिती कठीण होईल, असेही ते म्हणाले.

रविवारी वाढली रुग्णांची धावाधाव
रविवारी शहरातील अनेक औषधांची दुकाने बंद असतात. वर्धा रोड, धंतोली व इतर काही ठिकाणी मोजकीच दुकाने सुरू राहतात. यातच तीन दिवसांपासून औषध बाजार बंद असल्याने एकाच दुकानात सर्वच प्रकारच्या औषधी मिळणे कठीण झाले होते. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर धावाधाव करण्याची वेळ आली होती.

काही दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न
संदेश औषधांचा बाजारातील ज्या दुकानांना आगीची झळ पोहचली नाही, ती सोमवारपासून सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विजेसाठी जनरेटरची व्यवस्था केली जाणार आहे. अग्निशमन विभागाची मंजुरी मिळाल्यावरच दुकाने सुरू करता येणार आहे. मात्र,सोमवारीच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. औषधांचा तुटवडा पडणार नाही, यासाठी असोसिएशन पूर्ण प्रयत्न करीत आहे.
- राजेंद्र कावलकर, अध्यक्ष, नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन

Web Title: Only 40 percent of the drug stocks in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :medicineऔषधं