६२५ पैकी केवळ ४५ जणांना हवी ‘व्हीआरएस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:08 AM2021-03-01T04:08:56+5:302021-03-01T04:08:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सेवानिवृत्ती घेतल्यानंतर वर्षभरात केवळ तीनच महिन्याचे वेतन देण्याची तरतूद एसटी महामंडळाने केली आहे. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सेवानिवृत्ती घेतल्यानंतर वर्षभरात केवळ तीनच महिन्याचे वेतन देण्याची तरतूद एसटी महामंडळाने केली आहे. यामुळे नागपूर विभागात एसटीच्या ‘व्हीआरएस’ योजनेला फारच कमी प्रतिसाद मिळत आहे. ६२५ पैकी केवळ ४५ जणांनी यासाठी अर्ज केला आहे.
एसटी महामंडळाने ५० वर्ष किंवा त्यावरील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आणली आहे. या योजनेनुसार ५० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर त्यांना वर्षभरात तीन महिन्याचे वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु ही तरतूद महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मंजूर नाही.
एसटी महामंडळाच्या कामगार संघटनांचे म्हणणे आहे की, कर्मचाऱ्यांना एका वर्षात सहा महिन्याचे वेतन आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली पाहिजे. ही योजना लागू करण्याअगोदर एसटी महामंडळाने मान्यताप्राप्त संघटनांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी आणलेल्या या योजनेला कमी प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल ५८० कर्मचाऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यास नकार दिला आहे.
सहा महिन्याचे वेतन द्यावे
५० वर्षांहून अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांवर कुटुंबाची जबाबदारी वाढते. मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, घराचे हप्ते इत्यादींचे त्यांच्यावर ओझे असते. अशात सेवानिवृत्तीनंतर त्यांना वर्षात केवळ तीनच महिन्याचे वेतन देणे योग्य नाही. त्यांना सहा महिन्याचे वेतन आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची तरतूद हवी. तरच या योजनेला प्रतिसाद मिळू शकेल, असे मत एसटी कामगार संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी व्यक्त केले.