धानउत्पादक जिल्ह्यात केवळ ५० टक्के पाऊस
By admin | Published: September 9, 2016 01:44 AM2016-09-09T01:44:38+5:302016-09-09T01:44:38+5:30
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी सरासरी पाऊस कमी पडल्याने ५० टक्के संकटात सापडला आहे.
अस्मानी संकट : शासनाने उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावे, तारिक कुरैशी यांची मागणी
तुमसर : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी सरासरी पाऊस कमी पडल्याने ५० टक्के संकटात सापडला आहे. या अस्मानी संकटावर मात करण्याकरिता राज्य शासनाने उपाययोजना करावी. शासनाने संबंधित विभागांना तशा सूचना करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्षांनी मुख्यमंत्री, कृषीमंत्री तथा जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे.
भंडारा व गोंदिया जिल्हे धान उत्पादक जिल्हे आहेत. या मोसमात केवळ ५० टक्के पाऊस पडला. येथील तलाव व सिंचन प्रकल्पात केवळ २० ते २५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.
धान पिकाला जास्त पाण्याची गरज असते. जलयुक्त शिवार योजनेतील जलसाठवण तलाव व तत्सम योजनेत पाणीसाठा नाही. पाऊसअभावी पीक येणार नाही, पुढे मोठी भिषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाऊस माघारी परतण्याचे दिवस सुरू झाले आहेत. राज्य शासनाने कृषी पंपाना १२ तास अविरत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय योग्य आहे.
अस्मानी संकटाशी लढा देण्याकरिता राज्य शासनाने त्वरीत उपाययोजना करण्याची गरज आहे. शासनाच्या सर्व यंत्रणेला शासनाने निर्देश देण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)