नागपुरात ५०० रुपयाच्या वादात महिलेवर खुनी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:33 AM2018-04-05T01:33:06+5:302018-04-05T01:33:18+5:30
केवळ ५०० रुपयाच्या वादात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करून महिलेसह तिघांना जखमी करण्यात आले. मंगळवारी रात्री हुडकेश्वर ठाणे परिसरातील म्हाळगीनगरात घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केवळ ५०० रुपयाच्या वादात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करून महिलेसह तिघांना जखमी करण्यात आले. मंगळवारी रात्री हुडकेश्वर ठाणे परिसरातील म्हाळगीनगरात घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी आरोपी बाळकृष्ण सरदार बोरकर (४७) रा. न्यू नेहरूनगर याला अटक केली आहे.
बोरकर सेंट्रिंगचे काम करतो. त्याची सुनीता ढोले (३८) यांच्याशी जुनी ओळख आहे. सुनीता कॅटरिंगचे काम करते. तिने काही दिवसांपूर्वी बोरकरकडून १० हजार रुपये उधार घेतले होते. सुनीताने ते पैसे बोरकरला परतही केले. परंतु बोरकर आणखी ५०० रुपये शिल्लक असल्याचे म्हणत होता. यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू होता. मंगळवारी रात्री ७ वाजता बोरकरने सुनीताला चर्चेसाठी म्हाळगीनगरातील एनआयटी गार्डनमध्ये बोलावले. तिथे तो सुनीताला ५०० रुपये मागू लागला. परंतु तिने नकार देताच त्याला राग आला. सुनीताने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच वेळी बोरकरने चाकू काढला आणि महिलेवर वार केले. यात गंभीर जखमी झालेली सुनीता ओरडू लागली. तिच्या ओरडण्याचा आावाज ऐकून गार्डनमध्ये फिरत असलेले लोक आले. त्यांनी बोरकरला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने लोकांवरही हल्ला केला. यात दोन युवकही जखमी झाले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. सुनीताला रुग्णालयात दाखल करून पोलिसांना कळविण्यात आले. हुडकेश्वर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न व हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.