ग्रामपंचायतींमध्ये ५७ टक्के महिलाच कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:09 AM2021-01-20T04:09:51+5:302021-01-20T04:09:51+5:30
जितेंद्र ढवळे नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता गावागावात सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सरपंचपदाच्या आरक्षण ...
जितेंद्र ढवळे
नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता गावागावात सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यात विजयी झालेल्या महिला ग्रा.पं.सदस्यांना हक्काच्या जागा मिळतीलच. जिल्ह्यात निवडणूक झालेल्या १२९ ग्रा.पं. मध्ये ६६९ (५७ टक्के) महिला सदस्य विजयी झाल्या आहेत. त्यामुळे सरपंच कुणीही व्होवो गावाचा कारभार महिलांकडे राहणार, हे निश्चित.
जिल्ह्यात १३० ग्रा.पं.च्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. तीत कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) आणि सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली. कुही तालुक्यातील देवळी कला ग्रा.पं.ची निवडणूक मतदार यादीच्या वादामुळे रद्द करण्यात आली. सोमवारी १२७ ग्रा.पं.चे निकाल जाहीर झाले. यात दोन बिनविरोध ग्रा.पं. सहीत एकूण १,१७५ उमेदवार विजयी झाले आहेत. तीत महिलांची संख्या ६६९ (५७ टक्के) इतकी आहे. जिल्ह्यात १२७ ग्रा.पं.च्या ४११ वॉर्डात निवडणूक झाली. यासाठी ३०१५ उमेदवार रिंगणात होते. यात महिला उमेदवारांची संख्या १४८५ इतकी होती. महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यामुळे गावाच्या विकासातही ‘होम मिनिस्टर’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा
निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती : १२९
निवडून आलेले उमेदवार : १,१७४
ग्रा.पं. निवडणुकीत विजयी महिला उमेदवार : ६६९
कुही तालुक्यात महिलांचे वर्चस्व
जिल्ह्यात सर्वाधिक २४ ग्रा. पं. साठी कुही तालुक्यात निवडणुका झाल्या. येथे २०६ विजयी उमेदवारांपैकी ११५ महिलांचा समावेश आहे. कुही पाठोपाठ १७ ग्रा. पं. साठी निवडणुका झालेल्या नरखेड तालुक्यात ८३ महिला विजयी झाल्या आहेत. तालुकानिहाय विजयी महिला उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : काटोल (१३), सावनेर (६२), कळमेश्वर (२८), रामटेक (४२), पारशिवनी (४४), मौदा (३९), कामठी (५२), उमरेड (६८), भिवापूर (१६), नागपूर ग्रामीण (७९), हिंगणा (२८)
विजयी महिला उमेदवारांच्या प्रतिक्रिया
गावातील स्वच्छता व आरोग्यविषयक समस्यांवर काम करायचे आहे. गावातील सांडपाणी, उकिरडे याचे गावाबाहेर नियोजन करून चांगले रस्ते व वॉटर हार्वेस्टिंगवर काम करायचे आहे.
- नीलिमा उमरकर, ग्रा.पं.सदस्या, थडीपवनी
--
गोरगरीब गरजूंना स्वत:च्या हक्काचे छत मिळावे. गावातील मुले तालुकास्थळी शिक्षणासाठी जातात. त्यांच्या नियोजित वेळेत महामंडळाची बस गावात पोहचत नाही. पुल्लर गाव अभयारण्याने प्रभावित आहे. येथे वन्यप्राण्यांच्या उपद्व्यापाने ग्रामस्थ त्रस्त आहेत. या समस्यांची सोडवणूक करायची आहे. गावात स्वच्छता नांदावी, दर्जेदार शिक्षण मिळावे, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार.
शीतल मंगर, ग्रा.पं.सदस्या, पुल्लर
-
स्वच्छ प्रशासन व शासनाच्या योजना अधिकाधिक लोकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार. काटोल ते खंडाळा उर्वरित रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासोबतच गावातील शेतकऱ्यांना चांगले पांदण रस्ते उपलब्ध करून देणे हे पुढील पाच वर्षातील प्रमुख लक्ष्य राहणार आहे.
वच्छला ढोबळे, ग्रा.पं.सदस्या, खंडाळा खुर्द