सापांच्या फक्त ६९ जाती विषारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 09:57 PM2018-08-14T21:57:22+5:302018-08-14T22:03:29+5:30
श्रावणपंचमी अर्थात नागपंचमी अर्थात सापांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा उत्सव म्हणून आपण हा सण साजरा करतो. साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल जेवढी भीती, आकर्षण, जिज्ञासा आपल्या मनात असते तेवढेच अज्ञानही आहे. जगात सापाच्या तब्बल ३ हजार ७५जाती असून, भारतात त्यातील सुमारे २८२ प्रकारचे साप आढळतात व त्यात ६९ साप हे विषारी असतात. त्यातील पाच-सहा जातीचे साप जास्त प्रमाणात आढळतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रावणपंचमी अर्थात नागपंचमी अर्थात सापांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा उत्सव म्हणून आपण हा सण साजरा करतो. साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल जेवढी भीती, आकर्षण, जिज्ञासा आपल्या मनात असते तेवढेच अज्ञानही आहे. जगात सापाच्या तब्बल ३ हजार ७५जाती असून, भारतात त्यातील सुमारे २८२ प्रकारचे साप आढळतात व त्यात ६९ साप हे विषारी असतात. त्यातील पाच-सहा जातीचे साप जास्त प्रमाणात आढळतात.
सापांचे प्रकार अनेक आहेत. त्यात बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे. विषारी सापांमध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे व काही समुद्री सापांचा समावेश आहे. एकूण विषारी सर्पदंशांपैकी निम्म्याहून अधिक दंश नाग व मण्यार यांचेच असतात. त्याखालोखाल फुरसे, घोणस यांचा नंबर लागतो. नाग व मण्यार यांचे विष मुख्यत: मज्जासंस्थेस तर फुरसे, घोणस यांचे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस घातक असते. विषारी सापाच्या अगदी अंड्यातून बाहेर पडलेल्या पिलांनाही थोडे का होईना विष असते.
सापांना वाचवा
अन्नधान्याची नासाडी करणाºया उंदरांची संख्या जगातील मानवी लोकसंख्येच्या चौपट आहे. उंदरांच्या मलमूत्रातून लेप्टोस्पायरोसिससारखे घातक रोग होतात. उंदरांचा बंदोबस्त फक्त सापच करू शकतात. त्यामुळे सापांची हत्या करू नका, असे आवाहन सर्पमित्र स्वप्नील बोधाने यांनी केले आहे. बोधाने यांनी सांगितले, नागपंचमीनिमित्त आजही अनेक भागांत गारुडी हे टोपलीमध्ये साप व नाग घेऊन घरोघर हिंडताना दिसतात. बरेचसे भाविक मोठ्या श्रद्धेने पूजा करून त्यांना दूध प्यायला देतात. मात्र दूध हे सापाचे अन्न नसून उंदीर, बेडूक यासारखे प्राणी त्यांचे मुख्य अन्न आहे. गारुड्यांजवळ असलेल्या सापांचे ‘विषदंत’ म्हणजे दात काढून टाकलेले असतात. या सापांना सात ते आठ दिवसांपासून अन्नपाण्याविना उपाशीच ठेवलेले असते. त्यामुळे जेव्हा भाविक त्या सापाला दूध पाजतात तेव्हा उपाशी साप नाईलाजाने दूध प्राशन करतो व नंतर काही दिवसांनी मृत्युमुखी पडतो.
विषारी-बिनविषारी सापाच्या खुणा
बिनविषारी साप चावल्यास
१. चावलेल्या दातांच्या खुणा बऱ्याच व रांगेत दिसतात.
२. चावलेल्या जागेतून द्रव जास्त वाहात नाही.
३. चावलेली जागा काळी-निळी होत नाही.
४. चावलेल्या जागी खूप सूज येत नाही.
विषारी साप चावल्यास
१. एक-दोन दातांच्याच खुणा दिसतात.
२. चावलेल्या जागेतून द्रव किंवा रक्त वाहते.
३. चावलेली जागा काळी-निळी होते.
४. चावलेल्या जागी खूप सूज येते.
५. फुरसे किंवा घोणस चावला तर त्या जागी फार सूज येते व ती वाढत जाते. या सापाच्या विषामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. मूत्रपिंडावरही परिणाम होतो.
६ नाग किंवा मण्यार चावल्यास त्या जागी सूज येते. दहा मिनिटांतच डोळ्यांवर झापड यायला सुरुवात होते व श्वासोच्छवासाला त्रास सुरू होतो. बोलायला, गिळायला, हालचाल करायला त्रास होऊ लागतो. तोंडातून लाळ गळायला लागते.