फक्त ७२ जाती विषारी
By admin | Published: August 1, 2014 01:12 AM2014-08-01T01:12:09+5:302014-08-01T01:12:09+5:30
श्रावणपंचमी म्हणजे नागपंचमी अर्थात सापांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा उत्सव म्हणून आपण हा सण साजरा करतो. साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल जेवढी भीती व आकर्षण, जिज्ञासा
भारतात आढळतात २८२ प्रकारचे साप
नागपूर : श्रावणपंचमी म्हणजे नागपंचमी अर्थात सापांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा उत्सव म्हणून आपण हा सण साजरा करतो. साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल जेवढी भीती व आकर्षण, जिज्ञासा आपल्या मनात असते तेवढेच अज्ञानही आहे. जगात सापाच्या तब्बल ३ हजार ७५ जाती असून, भारतात त्यातील सुमारे २८२ प्रकारचे साप आढळतात व त्यात ७२ साप हे विषारी असतात. त्यातूनही पाच-सहा जातीचे साप जास्त प्रमाणात आढळतात. सापांचे प्रकार अनेक आहेत. त्यात बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे. विषारी सापांमध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे व काही समुद्री सापांचा समावेश आहे. एकूण विषारी सर्पदंशांपैकी निम्म्याहून अधिक दंश नाग व मण्यार यांचेच असतात. त्याखालोखाल फुरसे, घोणस यांचा नंबर लागतो. नाग व मण्यार ह्यांचे विष मुख्यत: मज्जासंस्थेस तर फुरसे, घोणस यांचे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस घातक असते. विषारी सापाच्या अगदी अंड्यातून बाहेर पडलेल्या पिलांनाही थोडे का होईना विष असते.
ंसापांना वाचवा
अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांची संख्या जगातील मानवी लोकसंख्येच्या चौपट आहे. उंदरांच्या मलमूत्रातून लेप्टोस्पायरोसिससारखे घातक रोग होतात. उंदरांचा बंदोबस्त फक्त सापच करू शकतात. त्यामुळे सापांची हत्या करू नका, असे आवाहन सर्पमित्र स्वप्नील बोधाने यांनी केले आहे. बोधाने यांनी सांगितले, नागपंचमीनिमित्त आजही अनेक भागांत गारुडी टोपलीमध्ये साप व नाग घेऊन घरोघर हिंडताना दिसतात. बरेचसे भाविक मोठ्या श्रद्धेने पूजा करून त्यांना दूध प्यायला देतात. मात्र दूध हे सापाचे अन्न नसून उंदीर, बेडूक ह्यासारखे प्राणी त्याचे मुख्य अन्न आहे. गारुड्यांजवळ असलेल्या सापांचे ‘विषदंत’ म्हणजे दात काढून टाकलेले असतात. या सापांना सात ते आठ दिवसांपासून अन्नपाण्याविना उपाशीच ठेवलेले असते. त्यामुळे जेव्हा भाविक त्या सापाला दूध पाजतात तेव्हा उपाशी साप नाईलाजाने दूध प्राशन करतो व नंतर काही दिवसांनी मृत्युमुखी पडतो.
महिन्याला २५० साप पकडतात
घर, कार्यालय व रस्त्यावर आलेल्या सापांना जीवदान देण्याचे कार्य विदर्भ सर्पमित्र समिती, पीपल्स फॉर अॅनिमल आणि वाईल्डसर संस्था ही अनेक वर्षांपासून करीत आहेत. शहरातील सर्पमित्र एका दूरध्वनीवर आपल्या जीवाची बाजी लावून साप पकडतात आणि त्याला जंगलातही सोडतात. महिन्याला सर्पमित्रांकडून साधारण २५० साप पकडले जात असल्याची माहिती आहे.
हे करा
वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी काम करणारी संस्था सोसायटी फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन, एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (वाईल्ड सीईआर) या संस्थेने नागपंचमीनिमित्त गारुड्यांकडून सापांचा असा छळ होऊ नये म्हणून गारुडी साप घेऊन आल्यास वन विभागाला किंवा संस्थेच्या कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या प्रयत्नाने एका सापाचे जरी प्राण वाचले तरी नागपंचमी खऱ्या अर्थाने साजरी होईल, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. बहार बावीस्कर यांनी केले. गारुड्याचा खेळ चालू असल्याचे निदर्शनास आल्यास वन विभागाला कळवा किंवा वाईल्ड सीईआर संस्थेच्या ८२३७६०४१८८ किंवा ८९७५७३७९९१ (मयुरेश जोशी) या क्रमांकावर संपर्क करावा.
मनपाची रेफर मेयो, मेडिकलकडे
आरोग्य सुविधा हा नागरिकांचा हक्क आहे. मात्र महापालिका त्याबाबत उदासीन असल्याचेच चित्र शहरामध्ये पाहावयास मिळत आहे. ५० हजार लोकसंख्येसाठी एक बाह्य रु ग्ण विभाग आणि एक लाख लोकसंख्येसाठी रु ग्णालय असे सरकारचे धोरण असताना महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. सद्यस्थितीत तीन रुग्णालये आणि ३५ बाह्य रुग्ण विभाग आहेत. परंतु सुरुवातीपासून कुठेच ‘अॅन्टी स्नेक व्हेनम’ उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याने आलेल्या रुग्णाला मेयो, मेडिकलकडे पाठविले जाते.
मेयोमध्ये दीड महिन्यांपासून इंजेक्शनच नाही
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दीड महिन्यांपासून ‘अॅन्टी स्नेक व्हेनम’ इंजेक्शनच नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन बाहेरून विकत आणावे लागते. त्यांनी आणले तरच ते रुग्णाला दिले जाते. विशेष म्हणजे, विषारी सर्पदंशाच्या रुग्णाला दिवसभरात २० इंजेक्शन दिले जातात. गरीब रुग्णाला हे परवडणारे नाही. शासनाच्या अनास्थेला रुग्ण बळी पडत आहे.