‘मेयो’त कोरोनासाठी मंजूर रकमेपैकी ८० टक्केच खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:08 AM2021-05-21T04:08:10+5:302021-05-21T04:08:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश झाल्यापासून इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सन २०२०-२१ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश झाल्यापासून इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोनावरील उपचार व सुविधांसाठी रुग्णालयाला ३१ कोटींहून अधिक निधी मंजूर झाला होता. त्यापैकी ८० टक्केच रक्कम खर्च झाली आहे. गेल्या सव्वा वर्षात केवळ औषधांवरच सव्वातीन कोटींहून अधिक खर्च झाल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मेयो रुग्णालयाकडे विचारणा केली होती. २०२०-२१ या कालावधीत रुग्णालयाला कोरोनासाठी किती रक्कम मंजूर झाली व किती खर्च झाली, औषधांसाठी किती निधी खर्च झाला तसेच औषधे व यंत्रसामुग्रीसाठी ‘हाफकिन’ला किती रक्कम पाठविण्यात आली, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. त्यानंतर प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार मागील आर्थिक वर्षात कोरोनासाठी मेयो रुग्णालयाला ३१ कोटी ४८ लाख ७० हजार ३०८ रुपयांची रक्कम प्राप्त झाली. त्यापैकी २५ कोटी ३१ लाख ०९ हजार ४२९ रुपये खर्च करण्यात आले. दिनांक १ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत मेयोत औषधांसाठी ३ कोटी ४३ लाख ५७ हजार ५७ रुपये खर्च करण्यात आले.
मेयोला लागणाऱ्या विविध यंत्रसामुग्री व औषधांसाठी हाफकिन महामंडळाला ११ कोटी ८४ लाख ८ हजार १८८ रुपये पाठविण्यात आले. तर यंत्रसामुग्रीसाठीची रक्कम ६ कोटी १३ लाख ३९ हजार ८४५ रुपये इतकी होती.