एकही डोस न घेतलेल्यांचे आता करायचे तरी काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 05:59 PM2021-12-12T17:59:36+5:302021-12-12T18:59:52+5:30
१८ ते ४४ वयोगटात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या इतर वयोगटाच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. आतापर्यंत या वयोगटात ८२ टक्केच लोकांनी पहिला डोस घेतला.
लोकमत इन्फोग्राफिक्स
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होऊन ११ महिने झाले असतानाही १८ ते ४४ वयोगटात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या इतर वयोगटाच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. आतापर्यंत या वयोगटात ८२ टक्केच लोकांनी पहिला डोस घेतला. १८ टक्के लोक अद्यापही पहिला डोसपासून दूर आहेत. विविध योजना राबवूनही लसीकरणापासून दूर असलेल्या या लोकांचे करायचे काय, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
जिल्ह्यात ८ डिसेंबर २०२१ पर्यंत ३४९८१३९ लोकांनी पहिला डोस, तर २०४९५४७ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ वर्षांवरील लोकसंख्येत जवळपास ९३.४३ टक्के लोकांनी पहिला, तर ५४.७४ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.
४५ वर्षांवरील वयोगटात ९७ टक्के लसीकरण
नागपूर जिल्ह्यात १७ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. यात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर फ्रंट लाईन वर्कर्स, ६० वर्षांवरील ज्येष्ठ व ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेले रुग्ण व सर्वांत शेवटी १८ ते ४५ वयोगटांतील लोकांचे लसीकरण हाती घेण्यात आले. आतापर्यंत ७९.३८ टक्के आरोग्य कर्मचारी, ९०.४२ टक्के फ्रंट लाईन वर्कर्स, ८२.१८ टक्के १८ ते ४४ वयोगट, तर ९७.४३ टक्के ४५ वर्षांवरील वयोगटातील लोकांनी पहिला डोस घेतला आहे.
असे झाले लसीकरण
वयोगट : पहिला डोस : दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी : ६७८८६ : ६०७६९
फ्रंटलाईन वर्कर्स : १३४०१८ : ११८८०३
१८ ते ४४ वयोगट : १८९३६९२ : ९४०५५८
४५ व त्यावरील वयोगट : १४०२५४३ : ९२९४१७
- पहिला डोस घेण्यात कमी पडलेले तालुके
नागपूर ग्रामीण : ८१.४६ टक्के
रामटेक : ८३.०३ टक्के
कामठी : ८४.१४ टक्के
हिंगणा : ८४.८१ टक्के
सावनेर : ८८.८२ टक्के
(उर्वरित तालुक्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. )
-आतापर्यंत एकूण बाधित : ४९३७१२
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : ८१
कोरोनाचे बळी : १0,१२२