प्रत्यक्ष सहभाग घेतल्यावरच संघ कळतो
By admin | Published: May 16, 2017 02:10 AM2017-05-16T02:10:20+5:302017-05-16T02:10:20+5:30
पाण्यामध्ये उतरल्याशिवाय पोहणे शिकता येत नाही. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्य केल्याशिवाय संघ कळत नाही, ...
दत्तात्रय होसबोळे यांचे मत : संघ शिक्षा वर्गाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाण्यामध्ये उतरल्याशिवाय पोहणे शिकता येत नाही. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्य केल्याशिवाय संघ कळत नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह दत्तात्रय होसबोळे यांनी व्यक्त केले.
रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात सोमवारपासून तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाला सुरुवात झाली. याप्रसंगी बोलताना त्यांनी संघाचे महत्त्व सांगितले.
पुस्तके वाचल्याने, पुस्तके लिहिल्याने किंवा संशोधन केल्यामुळे संघ कळत नाही. संघाला समजण्यासाठी संघाचे कार्य करणे आवश्यक आहे. स्नेह, आत्मियता, समर्पण व नि:स्वार्थी भाव या गुणांमुळे स्वयंसेवक राष्ट्रीय जीवनाचे केंद्रबिंदू झाले आहेत. समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी व संकटावर मात करण्यासाठी जी शक्ती संघटित होऊन परिचित व अपरिचितांचे सद्भावपूर्वक स्वागत करते तिलाच स्वयंसेवक म्हणतात, असे होसबोळे यांनी सांगितले.
सर्वाधिकारी पृथ्वीराज सिंह यांनी संघ परिसरात आल्यानंतर दायित्व व जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होते, असे मत व्यक्त केले तर, पालक अधिकारी अनिल ओक यांनी जगामध्ये सर्वजन विनाशाची भाषा बोलत असल्यामुळे आज शीलासोबत शक्तीही आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात प्रामुख्याने अखिल भारतीय सह-सरकार्यवाह भागय्या, बौद्धिक प्रमुख स्वांत रंजन, शारीरिक प्रमुख सुनील कुलकर्णी, सह-शारीरिक प्रमुख जगदीश प्रसाद, व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे, सेवा प्रमुख पराग अभ्यंकर, कुटुंब प्रबोधन प्रमुख सुब्रमण्यम, वर्ग कार्यवाह रमेश काचम, मुख्य शिक्षक गंगा विष्णू, बौद्धिक प्रमुख रवींद्र किरकोले, सह-बौद्धिक प्रमुख सुनील देव, सेवा प्रमुख नवल किशोर, व्यवस्था प्रमुख दिलीप हाडगे उपस्थित होते. वर्गाचा समारोप ८ जून रोजी होईल.