गुंतवणूक कमी केल्यानंतरच कागद उद्योगाला येणार ‘अच्छे दिन’
By admin | Published: January 10, 2016 03:38 AM2016-01-10T03:38:57+5:302016-01-10T03:38:57+5:30
कागद उद्योग संकटात आहे. त्यातून बाहेर निघण्यासाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासह
नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : पेपर ट्रेडर्स असोसिएशनची बैठक
नागपूर : कागद उद्योग संकटात आहे. त्यातून बाहेर निघण्यासाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासह गुणवत्तेत सुधारणा आणि विजेचा खर्च कमी करावा लागेल. या गोष्टी ध्यानात ठेवून उत्पादन केल्यास कागद उद्योगाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
फेडरेशन आॅफ पेपर ट्रेडर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (एफपीटीए) नागपूर शाखेतर्फे आयोजित व्यवस्थापकीय समितीची दुसरी बैठक वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये शनिवारी पार पडली. मुख्य अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. ‘एफपीआयए’चे अध्यक्ष सी. बालासुब्रमणियन अध्यक्षस्थानी होते. विशेष अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, सेंच्युरी पल्प अॅण्ड पेपरचे मुख्य विक्री अधिकारी डॉ. अलोक प्रकाश आणि कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅटचे) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, पूनमचंद मालू होते. यावेळी स्मरणिका आणि एफपीटीएच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.
आयातीत कागदाची कमी किंमत
गडकरी म्हणाले, आयातीत कागदाची किंमत उत्पादन किमतीपेक्षा कमी आहे. सरकार खुल्या जागेवर उद्योजकांना झाडे लावण्याची परवानगी देण्याच्या विचारात आहे. त्याचा उपयोग कागद उद्योगांना होणार आहे. त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. भारतात पाण्याच्या माध्यमातून केवळ ३.५ टक्के उत्पादनांची वाहतूक केली जाते. हे प्रमाण अन्य देशात ३० टक्के आहे. या माध्यमातून वाहतूक वाढविण्याला सरकार प्रोत्साहन देत आहे. पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या कागदाच्या उत्पादनासाठी उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग आणि पर्यावरणाच्या हितार्थ टाकाऊ कागदाचा योग्यपणे निपटारा करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.
प्रवीण दटके यांनी नागपुरातील कागद उद्योग आणि प्रिटिंगचा इतिहास सांगितला. हा व्यवसाय हळूहळू कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली ‘एफपीटीए’चे अध्यक्ष सी. बालासुब्रमणियन यांनी असोसिएशनची स्थापना आणि महत्त्व सांगितले. विदेशाच्या तुलनेत कागद उद्योग उत्तम असल्याचे म्हणाले. बी. सी. भरतीया म्हणाले, उद्योजकांच्या हितासाठी सरकारने अनेक कायदे तयार केले असून त्याची माहिती नाही. कायद्याची माहिती करून घ्यावी. डॉ. आलोक प्रकाश म्हणाले, उद्योजकांनी उत्पादन आणि गुणवत्तेसह सेवेवर विशेष लक्ष द्यावे. बाजारपेठांच्या मागणीनुसार व्यवसाय टिकून राहतो, यावर त्यांनी सोदाहरण माहिती दिली. मूल्यवर्धित सेवेची गरज असल्याचे सांगितले. ‘एफपीटीए’चे माजी अध्यक्ष महेश खंडेलवाल यांनी नागपुरात या उद्योगाच्या वाढीची शक्यता व्यक्त केली. नागपुरात अनेक महत्त्वपूर्ण कंपन्या आणि संस्था सुरू होत आहेत. अशा स्थितीत या उद्योगाचे भविष्य उज्ज्वल आहे. (प्रतिनिधी)
असोसिएशनचे पदाधिकारी
यावेळी पेपर ट्रेडर्स असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष सुशील अग्रवाल, सचिव पीयूष फत्तेपुरीया, उपाध्यक्ष आल्हाद शास्त्री, कोषाध्यक्ष संजय कौशिक, सहसचिव राम खुबचंदानी, माजी अध्यक्ष मनोज बिर्ला, व्यवस्थापकीय समिती सदस्य विजय खंडेलवाल, असीम बोरडिया, राजेश आर. खंडेलवाल, गिरीश झुनझुनवाला, ललित सूद, अमर ग्यानचंदानी, आशिष पी. खंडेलवाल, विमल केयाल, नीरज खंडेलवाल, ओमप्रकाश मुद्रा, सतीश आहुजा, असीम बोरडिया, सुधीर जैन, सुनील गोयंका, जयप्रकाश अग्रवाल, निर्मल कोहाळ आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.