मेहरच्या एन्ट्रीनंतरच जय श्रीराम सोसायटी बुडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:07 AM2021-05-06T04:07:32+5:302021-05-06T04:07:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अध्यात्म गुरूचे सत्संग आयोजक आणि प्रॉपर्टी डीलर विठ्ठल मेहर हे जय श्रीराम अर्बन क्रेडिट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अध्यात्म गुरूचे सत्संग आयोजक आणि प्रॉपर्टी डीलर विठ्ठल मेहर हे जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीशी जुळल्यानंतरच येथील गुंतवणूकदारांचे वाईट दिवस सुरू झाले. पीडित गुंतवणूकदार जेव्हा अध्यात्म गुरूजवळ गेले, तेव्हा त्यांनी विठ्ठल मेहरला क्लीन चिट देत सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुळे यांच्यावरच अपहाराचे खापर फोडले होते.
८३ काेटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने २८ एप्रिल रोजी पारडी येथील रहिवासी प्राॅपर्टी डीलर विठ्ठल मेहरला अटक केली आहे. मेहरने जय श्री राम सोसायटीच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची संपत्ती अवैध पद्धतीने खरेदी केली आहे. तपासानंतर मेहरला अटक करण्यात आली. आर्थिक शाखेने आता, मेहरने आपल्या नातेवाईकांच्या नावाने खरेदी केलेली संपत्तीही सील करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. सूत्रानुसार मेहरकुळेने २०१४ मध्ये लाखो रुपये खर्च करून एका अध्यात्म गुरूचे सत्संग आयोजित केले होते. अध्यात्म गुरूनेच मेहरकुळेचा मेहरसोबत परिचय करून दिला. यानंतर दोन्ही गुरुबंधू एकत्र आले. मेहर सोसायटीशी जुळला आणि कारभार पाहू लागला. मेहरचा सावकारी व प्राॅपर्टी डीलिंगचा मोठा कारभार होता. तो सोसायटीच्या माध्यमातून देवाण-घेवाण करीत होता. त्याचे मेहरकुळेशी चांगले संबंध होते. मेहरकुळे-मेहर यांच्या जोडीने चार वर्षातच सोसायटी डबघाईस आणली. २०१८ मध्ये गुंतवणूकदारांना सोसायटी बुडत असल्याचे लक्षात आले. ते मेहरकुळे व त्याच्या साथीदारांना आपले पैसे परत मागण्यासाठी दबाव टाकू लागले. गुंतवणूकदारांना माहिती होते की, मेहरकुळे-मेहर यांच्या जोडीने अध्यात्म गुरू आणि सत्संगच्या आयोजनावर कोट्यवधी रुपये उधळले आहेत. धर्मगुरू त्यांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी मदत करू शकतात, या अपेक्षेने डिसेंबर २०१९ मध्ये गुंतवणूकदारांनी अध्यात्म गुरूची भेट घेतली. ते एका सत्संगसाठीच नागपुरात आले होते. गुंतवणूकदार अध्योध्यानगर येथील एका भक्ताच्या घरी अध्यात्म गुरूची भेट घेण्यासाठी पोहोचले. सुरुवातीला त्यांना आपले भक्त समजून अध्यात्म गुरूने वेळ नसल्याचे सांगितले. परंतु जेव्हा गुंतवणूकदार आल्याचे सांगण्यात आले, तेव्हा तो भेटीसाठी तयार झाला. परंतु अध्यात्म गुरूने मेहरला क्लीन चिट दिली आणि सोसायटी बुडण्यासाठी सर्वस्वीपणे मेहरकुळे दोषी असल्याचे सांगितले. गुंतवणूकदारांनाही याचे आश्चर्य वाटले. गुंतवणूकदारांनी जेव्हा मेहरकुळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी सुद्धा अध्यात्म गुरूला सर्व काही माहिती असल्याचे सांगत, आपले हात वर केले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी एकजूट होऊन लढण्याचा निर्णय घेतला. कोतवाली पोलीस कारवाई करीत नसल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली. १३ जुलै २०१९ रोजी न्यायालयाच्या निर्देशावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलीस कोठडी संपल्याने पोलिसांनी बुधवारी मेहरला न्यायालयात सादर केले. तेथून त्याला न्यायालयीन तुरुंगात पाठविण्यात आले.