दुकानदाराच्या अंगठ्यानेच द्या धान्य वितरणास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 10:13 PM2020-09-12T22:13:55+5:302020-09-12T22:16:21+5:30
राज्यासह जिल्ह्यातही कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुुळे शासनाने दुकानदारांसोबतच शिधापत्रिकाधारकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे, कोरोना संपेपर्यंत दुकानदारांच्या अंगठ्यांनी धान्य वितरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी विदर्भ रास्त भाव दुकानदार/केरोसीन विक्रेता संघटनेने शासनाकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यासह जिल्ह्यातही कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुुळे शासनाने दुकानदारांसोबतच शिधापत्रिकाधारकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे, कोरोना संपेपर्यंत दुकानदारांच्या अंगठ्यांनी धान्य वितरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी विदर्भ रास्त भाव दुकानदार/केरोसीन विक्रेता संघटनेने शासनाकडे केली आहे.
शासनाला पाठविलेल्या निवेदनात संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की, पुरवठा विभागाने ऑगस्ट २०२० पासून सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांच्या ई-पॉस मशीनवर अंगठे प्रमाणित करून धान्य वाटप करण्याचे आदेश देऊन कार्डधारक व दुकानदारांच्या आरोग्याशी खेळ सुरू केलेला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असून, सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांसोबतच दुकानदारही बळी पडत आहेत. नागपूर शहरात आजवर तीन रेशन दुकानदारांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर १४० वर दुकानदार बाधित झालेले आहेत. अशा परिस्थीतीत त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था आहे, याची साधी दखलसुदा शासनाने घेतलेली नाही. कोरोनामुळे जनता व दुकानदार बाधित झाले तरी शासनाला काही फरक पडत नाही, असे दिसून येत आहे. या कारणामुळे राज्य फेडरेशन ने ई-पॉस मशीनवर कार्डधारकांचे अंगठे प्रमाणित करणे त्वरित बंद करून दुकानदारांंचे अंगठे प्रमाणित करून धान्य वितरण करावे, या मागणीसाठी गत १ सप्टेंबरपासून धान्याचे वितरण बंद केलेले आहे. त्याचप्रमाणे रास्तभाव दुकानदार धान्य वितरण करीत नाही, याचीही शासनाने दखल घ्यावी. मृत दुकानदारांच्या कुटुंबाला विमा सुरक्षा म्हणून मदत करावी, अशी मागणीही संजय पाटील यांच्यासह सुभाष मुसळे, गुड्डू अग्रवाल, रितेश अग्रवाल, प्रफुल्ल भुरा, मिलिंद सोनटक्के, राजेश कांबळे, रूपेश सावरकर, शंकर भोयर, प्रेम टिक्कस, सुनील जैस आदींनी शासनाकडे केली आहे.