चंद्रपूरमध्ये केवळ अधिकृत फेरीवालेच व्यवसाय करतील; हायकोर्टाचे आदेश
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 4, 2024 08:06 PM2024-03-04T20:06:06+5:302024-03-04T20:08:20+5:30
महानगरपालिकेला मागितली यादी.
नागपूर : चंद्रपूरमध्ये केवळ अधिकृत फेरीवाल्यांनाच व्यवसाय करण्याची परवानगी द्या. इतर फेरीवाले रोडवर व्यवसाय करणार नाही, हे सुनिश्चित करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला दिले आहेत. तसेच, येत्या १२ जूनपर्यंत अधिकृत फेरीवाल्यांची यादी न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.
चंद्रपूरमधील फेरीवाल्यांना नियंत्रित करण्यासाठी रघुवंशी व्यापार संकुल संघटना व इतरांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व मुकुलिका जवळकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, महानगरपालिकेचे वकील ॲड. महेश धात्रक यांनी जैन चित्रपटगृह व न्यू इंग्लिश हायस्कूलजवळ फेरीवाल्यांना रोडच्या एका बाजूने रविवार बाजार भरविण्याची परवागी देण्यात आली आहे, अशी माहिती दिली व ही व्यवस्था शहर फेरीवाला समिती कार्यान्वित होतपर्यंत कायम राहील, याकडे लक्ष वेधले. न्यायालयाने हे मुद्दे रेकॉर्डवर घेऊन या ठिकाणी केवळ अधिकृत फेरीवाल्यांनाच व्यवसाय करता येईल, असे स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. हरीश ठाकूर यांनी कामकाज पाहिले.
फेरीवाला प्रतिनिधी निवडणूक मेपर्यंत
शहर फेरीवाला समितीमध्ये फेरीवाल्यांचे प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. ही निवडणूक प्रक्रिया तातडीने पूर्ण करा व येत्या ३१ मेपर्यंत फेरीवाला प्रतिनिधींची नावे समितीला सादर करा, असे निर्देश न्यायालयाने सहायक कामगार आयुक्तांना दिले. तसेच, ही नावे मिळाल्यानंतर समिती तातडीने कार्यान्वित करा, असे महानगरपालिकेला सांगितले.