"राज्यात भाजपा नेत्यांचा 'दिलासा' घोटाळा", संजय राऊत नेमकं काय सूचवू पाहताहेत?; पाहा Exclusive मुलाखत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:18 PM2022-03-24T23:18:51+5:302022-03-24T23:21:08+5:30
राज्यात महाविकास आघाडीच्या निर्मितीचे महत्वाचे शिलेदार आणि शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत.
राज्यात महाविकास आघाडीच्या निर्मितीचे महत्वाचे शिलेदार आणि शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. शिवसंपर्क अभियानाअंतर्गत ते नागपूरच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संजय राऊत यांनी 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत भाजपावर हल्ला चढवताना एक नवा आरोप केला आहे. महाराष्ट्रात भाजपा नेत्यांचा दिलासा घोटाळा सुरू असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. भाजपा नेत्यांविरोधात पुरावे असतानाही अद्याप कारवाई का झालेली नाही असं संजय राऊत यांना विचारण्यात आलं. "पोलीस आपलं काम करत आहेत आणि कारवाई सुरू झालेली आहे. पण भाजपा नेत्यांचा 'दिलासा' घोटाळा सुरू आहे", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपा नेत्यांना कोर्टात गेल्यावर लगेच दिलासा मिळतो हाच मोठा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
"भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबै बँकेतील घोटळ्यासंबंधी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आपलं काम करत आहेत. त्यांनी आधीच कोर्टात जाऊन अटकपूर्व जामीन मिळवला आहे. भाजपा नेते कोर्टात जाऊन कारवाईला कशी स्थगिती आणता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत आणि कोर्ट त्यांना दिलासा देखील देतंय हाच मोठा घोटाळा आहे. आमचे लोक कोर्टात गेले की दिलासा मिळत नाही. पण हे लोक (भाजपा नेते) कोर्टात गेले की लगेच दिलासा मिळतो. तुमच्याच लोकांना दिलासा का? हा एक मोठा दिलासा घोटाळा आहे", असं संजय राऊत म्हणाले.
नागपूर सध्या रिकामी दिसतंय
"नागपूरचे सगळे नेते मुंबईत जाऊन बसलेत. नागपूर सध्या रिकामी दिसतंय म्हणून मी इथं आलोय", असंही संजय राऊत यावेळी म्हणाले. "विदर्भ आणि मराठवाड्यात पक्ष संघटनेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार मी इथं पक्षाच्या कामासाठी आलो आहे. मी इथं कुणाला शह वगैरे देण्यासाठी आलेलो नाही", असं संजय राऊत म्हणाले. याआधी आम्ही युतीत लढत होतो त्यामुळे इथं भाजपाचा बालेकिल्ला आहे. याच कारणामुळे ज्या प्रमाणात इथं आमचा पक्ष वाढायला हवा होता तसा वाढला नाही. पण आता त्याकडे आम्ही लक्ष देत आहोत, असंही संजय राऊत म्हणाले.
मोदी हिमालयात अन् सोमय्यांकडे सूत्र
संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरही यावेळी निशाणा साधला. किरीट सोमय्यांनी आता मातोश्रीवरही धडक देणार असल्याच म्हटलं आहे. याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं असता आम्ही वाट बघतोय, कोण येतंय ते आम्हाला पाहायचं आहे असं म्हटलं. "केंद्रीय तपास यंत्रणांची ईडी, सीबीआय यांची सुत्रं मोदींनी किरीट सोमय्या यांच्याकडे दिली आहेत आणि स्वत: हिमालयात जाऊन बसले आहेत", असा टोला संजय राऊत यांनी लगावला.