सबसिडीचे केवळ ‘गाजर’, सिलिंडर गेले ९११ वर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:47+5:302021-08-22T04:11:47+5:30
अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : चुलीचा धूर गायब झाला आणि अनेकांकडे स्वयंपाकाचा गॅस आला. साधारणत: ८-१० ...
अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : चुलीचा धूर गायब झाला आणि अनेकांकडे स्वयंपाकाचा गॅस आला. साधारणत: ८-१० वर्षांपूर्वी धूरविरहित गॅस सिलिंडरमुळे असंख्य माता-भगिनींच्या चेहऱ्यावर हसू फुलू लागले होते. ५००-६०० रुपयात कसेबसे काम भागायचे. सहा महिन्यातून वा वर्षभरातून एकदाच गॅस सिलिंडरची दरवाढ होत असे. आता प्रत्येक महिन्याला दरवाढ होत आहे. ऑगस्टमध्ये तब्बल २५ रुपयांनी गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले असून, आता नागरिकांना ९११ रुपये ५० पैसे मोजावे लागत आहेत.
साधारणत: ऑगस्टपासून सण-समारंभाला प्रारंभ होतो. रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गणेशोत्सव, ईद, दसरा आणि दिवाळीचा आनंदपर्वसुद्धा उत्साहात साजरा होतो. अशा सणासुदीला गॅस सिलिंडरची ही मोठी दरवाढ गोरगरीब, सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारीच असल्याच्या वेदना गृहिणींच्या आहेत. दुसरीकडे गॅस सिलिंडरची सबसिडी दिवसागणिक कमी होत आहे. पूर्वी सबसिडीमध्ये चढउतार असायचा. आता दरवाढ झाल्यानंतरही सबसिडीच्या रकमेत वाढ होताना दिसत नाही. दरवाढ वारंवार सुरू असली तरी गॅस सिलिंडर धारकांना मिळणारी सबसिडी मात्र स्थिर ठेवली जात आहे. यामुळे सबसिडी स्वरूपात खात्यात वळती होणारी रक्कम नाममात्र राहिलेली असून, सबसिडी नावाचे केवळ ‘गाजर’च दाखविले जात असल्याचा आरोप सर्वस्तरातून होत आहे.
जानेवारी २०२१ ला घरगुती गॅस सिलिंडरचे दर ७४६ रुपये होते. फेब्रुवारीमध्ये चक्क १०० रुपयांनी वाढ होत ८४६ रुपये असे दर आकाशाला भिडले. यामुळे कोरोनाच्या कठीण काळासह महागाईचा दुहेरी फटका नागरिकांना सोसावा लागला. अशातच मार्च महिन्यात पुन्हा २५ रुपयांची दरवाढ झाली. सिलिंडरचे दर ८७१ रुपये झाले. एप्रिल महिन्यात केवळ १० रुपये कमी करीत (८६१ रुपये) जरासा दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. मे आणि जून महिन्यात हे दर स्थिर होते. माहे जुलैमध्ये २५ रुपये ५० पैशांची महागाईची भर पडत ८८६ रुपये ५० पैसे असे सिलिंडरचे दर झालेत. यात आणखी २५ रुपयांनी दरवाढ झाली असून, ऑगस्टमध्ये ९११ रुपये ५० पैशाला सिलिंडर झाले. आठ महिन्यात १६५ रुपये ५० पैशांची झालेली अतोनात दरवाढ नागरिकांना चटके देणारीच ठरत आहे.
....
अशी झाली दरवाढ
जानेवारी - ७४६ रुपये
फेब्रुवारी - ८४६ रुपये
मार्च - ८७१ रुपये
एप्रिल - ८६१ रुपये
मे - ८६१ रुपये
जून - ८६१ रुपये
जुलै - ८८६.५० रुपये
ऑगस्ट - ९११.५० रुपये
....
सबसिडी बंदच्या मार्गावर
अंदाजे ८-१० वर्षांपूर्वी सिलिंडरचे दर ५००-६०० रुपयांच्या आसपास होते. टप्प्याटप्प्याने सिलिंडरचे दर वाढले. ग्राहकांच्या खात्यात दरानुसार सबसिडी जमा होत होती. मागील काही वर्षांपासून सबसिडीची रक्कम कमी होत गेली. सध्या ९११ रुपये ५० पैशाच्या सिलिंडरमध्ये ४० रुपये १० पैसे सबसिडी मिळते. एकीकडे सिलिंडरचे दर वाढत गेले असले तरी दुसरीकडे सबसिडीच्या रकमेत वाढ झालेली दिसत नाही. यामुळे कालांतराने सबसिडी बंद झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.
.....
छोटे सिलिंडर ३३५ रुपयाला
साधारणत: घरगुती सिलिंडर १४.२ किलोग्रॅम आणि ५ किलोग्रॅम अशा मोठ्या व छोट्या स्वरूपात येतात. १ ऑगस्टला छोट्या सिलिंडरचे दर ३२६ रुपये होते. १७ ऑगस्टपासून ३३५ रुपये झाले. १ जानेवारी २०२१ ला छोटा सिलिंडर २७५.५० रुपयाला मिळायचा. आता आठ महिन्यानंतर ५९ रुपये ५० पैशांची दरवाढ झाली आहे.
.....
व्यावसायिक सिलिंडर पाच रुपयाने स्वस्त
ऑगस्टमध्ये घरगुती सिलिंडरचे दर चांगलेच वाढले असले तरी १९ किलोग्रॅम वजनाचे व्यावसायिक सिलिंडरचे दर पाच रुपयाने घटले आहेत. १ ऑगस्टला १,७८७ रुपयात मिळणारे सिलिंडर आता १७ ऑगस्टपासून १,७८२ रुपयाला प्राप्त होत आहे.