मुख्यमंत्री किंवा पटेल विरोधात असतील तरच पोटनिवडणूक लढवणार - नाना पटोले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 01:13 PM2018-01-04T13:13:21+5:302018-01-04T13:19:11+5:30

भाजपातून नाराज होऊन पुन्हा काँग्रेच्या वाटेवर असलेले भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांना आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान दिलं आहे

Only by contesting the bypoll against the Chief Minister or the Patel - Nana Patole | मुख्यमंत्री किंवा पटेल विरोधात असतील तरच पोटनिवडणूक लढवणार - नाना पटोले 

मुख्यमंत्री किंवा पटेल विरोधात असतील तरच पोटनिवडणूक लढवणार - नाना पटोले 

Next

नागपूर - भाजपातून नाराज होऊन पुन्हा काँग्रेच्या वाटेवर असलेले भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांना आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान दिलं आहे. माध्यमांशी बोलाताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री किंवा पटेल विरोधात असतील तरच पोटनिवडणूक लढवणार अन्यथा नाही. नाना पटोले यांनी आज दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यामुळं त्यांची लवकरच घरवापसी होणार अशी चर्चा माध्यमांत सुरु आहे. तर काँग्रेसच्या इशाऱ्यावरच नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, असा आरोप करीत भाजपाने पटोले यांच्या राजीनाम्याचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.

दरम्यान,  गुजरात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपाचे बंडखोर नेते नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेटही घेतली. नाना पटोले यांनी गुजरातमध्ये भाजपाविरोधी प्रचारही केला.  

 जिल्हा परिषद सदस्य ते लोकसभा सदस्य असा पटोले यांचा चढता राजकीय आलेख आहे. वयाच्या २४व्या वर्षी त्यांनी १९८७ मध्ये जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष म्हणून लढविली. त्यानंतर, सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष त्यांनी वेधले. १९९४ची विधानसभा निवडणूक लाखांदूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढल्यानंतर, पुढच्या दोन्ही निवडणुका त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढविल्या आहेत.
‘नानाभाऊ’ या टोपण नावाने परिचित असलेले पटोले यांची एक ‘लढाऊ नेते’ अशीच ओळख आहे. राजकीय परिणामाची चिंता न करता, आजवर त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर स्वपक्षावर टीका करताना मागेपुढे पाहिले नाही.

काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी आघाडी सरकारच्या शेतकºयांप्रती उदासीन धोरणांविरुद्ध आवाज उठवून, डिसेंबर २००८मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, २००९ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढले आणि पराभूत झाले. जुलै २००९ मध्ये त्यांनी भाजपाचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला. २००९च्या साकोली विधानसभा क्षेत्रातून भाजपाच्या उमेदवारीवर विदर्भातून सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी झाले. पुढे २०१४मध्ये भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते.

Web Title: Only by contesting the bypoll against the Chief Minister or the Patel - Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.