पहिल्या शंभरात नागपुरातील एकच शिक्षण संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:11 AM2021-09-10T04:11:31+5:302021-09-10T04:11:31+5:30
नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात ...
नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला पहिल्या ६० मध्ये ‘रँकिंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा सर्व संस्थांत देशात ५७ वा क्रमांक आहे. अभियांत्रिकी संस्थांत ३० वा तर आर्किटेक्चर संस्थांत १७ वा क्रमांक आहे. मागील वर्षी ‘व्हीएनआयटी’ २७ व्या स्थानावर होते. ‘टॉप’ १०० विद्यापीठांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुठेही समावेश नसला तरी विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये ‘रँकिंग’ मिळाले आहे.
गुरुवारी जाहीर झालेल्या यादीत नागपुरातील सर्वच संस्था राष्ट्रीय पातळीवर माघारल्याचे दिसून आले. व्हीएनआयटी वगळता इतर एकाही अभियांत्रिकी महाविद्यालयाला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळविता आलेले नाही. मागील वर्षी अभियांत्रिकी संस्थांच्याच यादीमध्ये ‘आरकेएनईसी’ (रामदेवबाबा कमला नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज)११३ वा होता. यंदा हा क्रमांक ११९ इतका आहे. जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय (१३०), लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (१३६), यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (१४९) यांना पहिल्या १५० मध्ये स्थान आहे. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून नागपूर शहर उदयाला येत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय व फार्मसीमधील शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली असली तरी दर्जा मात्र अद्याप हवा तसा सुधारलेला नाही, हेच या ‘रँकिंग’मधून स्पष्ट होत आहे.
‘फार्मसी’त पहिल्या शंभरात ३ संस्था
देशातील ‘टॉप’ फार्मसी महाविद्यालयांमध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ‘श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी’ ला ४६ वे ‘रँकिंग’ मिळाले आहे. नागपूर विद्यापीठाचा पदव्युत्तर फार्मसी विभाग व दादासाहेब बालपांडे फार्मसी कॉलेज ५१ ते १०० या बॅन्डमध्ये आहेत.
नागपूर विद्यापीठाच्या पदरी परत निराशा
‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळविणाऱ्या नागपूर विद्यापीठाला मात्र पहिल्या शंभरात ‘रँकिंग’ मिळविण्यात यश आलेले नाही. देशपातळीवर विद्यापीठ १५१ ते २०० या क्रमांकांमधील विद्यापीठांमध्ये आहे. राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ पहिल्या शंभरात स्थान मिळाले आहे.
आयआयएमच्या रँकमध्ये सुधारणा नाही
२०२० मध्ये आयआयएम-नागपूर व्यवस्थापन संस्थांच्या गटात ४० व्या क्रमांकावर होते. यंदादेखील तोच क्रमांक आहे. यंदा आयआयएमच्या रँकमध्ये सुधारणा झाली नाही. आयएमटीचा ७६ ते १०० या बँडमध्ये समावेश आहे.