राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन वादविवाद स्पर्धेत उतरले फक्त आठ संघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:44+5:302021-06-06T04:06:44+5:30
नागपूर : स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारकडून वन-पर्यावरण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमातील ...
नागपूर : स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारकडून वन-पर्यावरण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमातील स्पर्धांना नगन्य प्रतिसाद मिळत आहे. देशपातळीवर हा उपक्रम राबविला जात असला तरी नियोजनाअभावी या जनजागृती उपक्रमाचा कसा बोजवारा उडाला, हे यावरून दिसत आहे.
‘७५ प्राणी प्रजाती-७५ प्राणिसंग्रहालये’ अशी आखणी या उपक्रमात करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाचा सप्ताह गोरेवाडामध्ये राबविला जात आहे. ३१ मेपासून बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या वतीने वाघ या राष्ट्रीय प्राण्यावर हा सप्ताह पाळला जात आहे. पहिल्या दिवशी ऑनलाइन उद्घाटनानंतर पुढे काय उपक्रम आणि कार्यक्रम झाले, याची खबरबात खुद्द स्थानिक प्रसार माध्यमांनाही गोरेवाडा व्यवस्थापनाने दिली नाही. या उपक्रमाअंतर्गत ऑनलाइन परिषद, छायाचित्रण स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी वाद-विवाद स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व ऑनलाइन चर्चासत्र असे विविध कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर घेतले जाणार होते. मात्र, याबद्दल साधी माहितीही प्रसार माध्यामांना देण्याची तसदी आयोजकांनी घेतली नाही.
वादविवाद स्पर्धेचे परीक्षण प्रेरणा बिंद्रा, डॉ. ख्रिस बाऊडन आणि डॉ. दीपंकर घोष यांनी केले. दिल्ली पब्लिक स्कूल, न्यूटाऊन, कोलकाता यांना सर्वोत्कृष्ट संघ जाहीर करण्यात आले. प्रीथिका देब (दिल्ली पब्लिक स्कूल, न्यूटाऊन, कोलकाता) द्वितीय सर्वोत्कृष्ट वक्ता तर ईश्वर सारडा व ईशान सारडा (सेंटर पॉइंट स्कूल, काटोल रोड, नागपूर) या दोन बंधूंना सर्वोत्कृष्ट वक्ता जाहीर करण्यात आले.
...
स्पर्धा देशपातळीवर, संघ फक्त आठ
या सप्ताहाचा एक भाग म्हणून पर्यावरणदिनी राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. यात देशभरातील शालेय विद्यार्थी सहभागी होणार होते. प्रत्यक्षात या ऑनलाइन वादविवाद स्पर्धेत फक्त आठ संघ उतरले. लॉकडाऊनच्या काळात अनेक ऑनलाइन उपक्रम उत्तम प्रतिसादाने यशस्वी होताना या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत फक्त आठच संघ उतरले. यावरून किती गंभीरपणे ही स्पर्धा राबविली गेली असावी, याची कल्पना येते. गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पंचभाई यांची यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नाही.
...