२४ अभ्यासक्रमाविनाच चालतेय भारतातील एकमेव फायर इंजिनियरींग कॉलेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:01 AM2018-08-29T11:01:34+5:302018-08-29T11:06:27+5:30
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एकमात्र ‘फायर कॉलेज’मध्ये २४ अभ्यासक्रम सुरूच झाले नाही. ३१ अभ्यासक्रमांमधून ‘बीई फायर इंजिनीअरिंग (चार वर्षांचा अभ्यासक्रम), ‘डिव्हिजनल आॅफिसर्स’, ‘स्टेशन आॅफिस’ व ‘सब आॅफिसर’ एवढेच अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एकमात्र ‘फायर कॉलेज’मध्ये २४ अभ्यासक्रम सुरूच झाले नाही. ३१ अभ्यासक्रमांमधून ‘बीई फायर इंजिनीअरिंग (चार वर्षांचा अभ्यासक्रम), ‘डिव्हिजनल आॅफिसर्स’, ‘स्टेशन आॅफिस’ व ‘सब आॅफिसर’ एवढेच अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.
संकटकाळी किंवा एखादी दुर्घटना घडल्यास ‘फायर कॉलेज’मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची किंवा अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते. परंतु अनेक अभ्यासक्रम सुरूच झाले नाही. अभ्यासक्रम सुरू न झाल्याने १२ शिक्षकांची भरती प्रक्रियाही रखडली आहे. केंद्रीय लोकनिर्माण विभागाच्या (सीपीडब्ल्यूडी) संथगतीच्या कामकाजामुळे फायर कॉलेज परिसरातील टेक्निकल ग्राऊंडही तयार झालेले नाही. विद्यार्थ्यांशी संबंधित समस्यांपेक्षा येथे अधिकाऱ्यांचे कार्यालय व अन्य कामांना प्राथमिकता दिलाी जात असल्याचे चित्र आहे. सूत्रानुसार, एका कॉलेजमध्ये दोन संचालकांचा मुद्दाही समोर आला आहे. समन्वयाच्या अभावामुळे अनेक कार्यही प्रभावित झाल्याचे सांगण्यात येते.
टेबलही मिळत नाही
सूत्रानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या कॉलेजमध्ये टेबलही मिळत नाही. इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिकल आणि फिजिक्स सेक्शनमध्ये तीन टेबलची गरज असताना, ते उपलब्ध करून देण्यात आले नाही.
तर केरळसारखी स्थिती उद्भवणार
वाढत्या औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे धोकेही वाढत आहेत. यात जर सरकारी धोरणांचा चुकीचा वापर होत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने अमलात आणले जात असेल तर केरळसारखी स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. अशा संकटाच्या वेळी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेला घेऊन अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.
-शमीम, संचालक (शैक्षणिक), नॅशनल फायर सर्विसेस कॉलेज
कधी काय झाले
- सुरुवातीला फायर कॉलेज निर्मितीचा खर्च १०३ कोटी रुपये होता.
- नंतर २०५ कोटी रुपये झाला, २०१० मध्ये प्रस्तावाला मंजुरी मिळाली.
- २०१३ मध्ये फायर कॉलेज पूर्ण तयार होणार होते.
- २०१८ मध्ये आतापर्यंत सुरक्षा भिंतीचे काम पूर्ण झाले नाही.
- सुरक्षा भिंतीचे बांधकाम न झाल्याने समाजविघातक तत्त्व कॉलेजमध्ये शिरतात.
- चोऱ्या वाढल्या असून, काही ठिकाणी लोखंडी ग्रील चोरीला गेले आहेत.