बुद्धी आणि मनातील आगच नवप्रवर्तन घडविते : विवेक नानोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:11 AM2020-02-14T00:11:20+5:302020-02-14T00:13:58+5:30
समाजासाठी, देशासाठी काही नवप्रवर्तन घडविण्यासाठी बुद्धी आणि मनामध्ये आग निर्माण करावी लागते. ही आग मनामध्ये निर्माण करा, असे प्रेरणादायी आवाहन प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी यांनी विद्यार्थ्यांना केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंजिनीअरिंग, एमटेक, बीटेक, मेडिकल अशा कितीही मोठमोठ्या पदव्या घ्या, तुमच्या शिक्षणाचा समाजाला, देशाला काही उपयोग होत नसेल तर या पदव्यांना काही अर्थ नाही. समाजासाठी, देशासाठी काही नवप्रवर्तन घडविण्यासाठी बुद्धी आणि मनामध्ये आग निर्माण करावी लागते. ही आग मनामध्ये निर्माण करा, असे प्रेरणादायी आवाहन प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी यांनी विद्यार्थ्यांना केले.
रामन विज्ञान केंद्राच्या इनोव्हेशन सेंटरच्या वार्षिक इनोव्हेशन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रीन वेन्सन बॉयोटेकचे संस्थापक व संचालक डॉ. प्रशांत अग्रवाल व रामन विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक विजय शंकर शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. नानोटी यांनी अनेक तरुणांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. केवळ युरोप, अमेरिकेतच नवे संशोधन होत नाही, ही क्षमता भारतीय विद्यार्थ्यांमध्येही आहे. त्यामुळे तुम्ही समाजासाठी काय करू शकता, याचा विचार करा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. अग्रवाल यांनी भविष्यातील गरजांचा विचार करून संशोधन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. येत्या ४०-५० वर्षांत जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढणार आहे.
महोत्सवामध्ये नागपूर विभागातील विज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २०० विद्यार्थ्यांनी ८० अभिनव प्रयोगांसह सहभाग घेतला. एकाचवेळी पेट्रोल आणि बॅटरीवर चालणारी हायब्रीड मोटरसायकल, हेल्मेट घातल्यानंतरच सुरू होणारी मॉडर्न बाईक, स्ट्रेचर आणि सायकल म्हणूनही उपयोगात येणारी व्हिलचेअर, इंटिग्रेटेड कुलर आणि हिटर, हवा भरण्याच्या पंपने तुषार सिंचन करणारा प्रयोग, कमी वेळात ई-व्हेईकल चार्ज करणारे तंत्र, मानव-वन्यजीव संघर्ष टाळणारी तोफ, शेतात ठेवण्यासाठी आधुनिक बुजगावने, सूर्याची अतिनील किरणे सोसण्याचे तंत्र, बियाण्यांना रोगमुक्त करणारे रासायनिक द्रव्य असे नानाविध आणि इनोव्हेटिव्ह प्रयोग विद्यार्थ्यांना सादर केले. यातील निवडक प्रयोगांना विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे स्पॉन्शरशिप आणि स्कॉलरशिप देऊन उद्योग स्थापण्यासाठी सहकार्य करण्याची घोषणा डॉ. प्रशांत अग्रवाल यांनी यावेळी केली. रामन विज्ञान केंद्रातर्फे अभिनव प्रयोगासाठी पेटंट मिळावे म्हणून सर्व सहकार्य करण्याचा विश्वास केंद्राचे विजय शंकर शर्मा यांनी दिला.