'जीडीपी' ठरविण्याचे सूत्रच चुकीचे : बजरंगलाल गुप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 10:39 PM2019-09-25T22:39:42+5:302019-09-25T22:43:27+5:30
आपल्या देशातील एकूण सामाजिक व आर्थिक स्थिती तसेच विविधता लक्षात घेता ‘जीडीपी’ ठरविण्याचे सूत्र व प्रक्रियाच चुकीची असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या देशाने आर्थिक क्षेत्रात पाश्चिमात्य देशांची नकल केली. ‘जीडीपी’च्या आधारावर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यात येते. परंतु आपल्या देशातील एकूण सामाजिक व आर्थिक स्थिती तसेच विविधता लक्षात घेता ‘जीडीपी’ ठरविण्याचे सूत्र व प्रक्रियाच चुकीची असल्याची बाब निदर्शनास आली आहे. विकासाच्या नवीन ‘मॉडेल’ला विकसित करण्याची आवश्यकता आहे, असे मत दिल्ली विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ व संघ विचारक डॉ. बजरंगलाल गुप्ता यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातर्फे विकासाच्या नवीन मानकांसंदर्भात व्याख्यानाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पदव्युत्तर गणित विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.निर्मलकुमार सिंह, डॉ.जितेंद्र वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते. पाश्चिमात्य देशांचे आपण अनुकरण केले. ‘जीडीपी’ मोजण्याची प्रक्रियाच चुकीची आहे. आपल्या समाजातील घरांघरांमध्ये गृहिणीदेखील दररोज अनेक खाद्यपदार्थ बनवतात. आपल्या इथे उत्पादन तर होत आहे, मात्र त्याचा समावेश ‘जीडीपी’त होत नाही. बाहेरील देशात हेच पदार्थ बाहेरुन विकत घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचा ‘जीडीपी’ वाढल्याचे दिसून येते. शेतकरी उत्पादनातील काही भाग स्वत: तसेच नातेवाईकांसाठी ठेवतो. उर्वरित उत्पादन ‘मार्केटेबल सरप्लस’ म्हणून विकण्यासाठी घेऊन जातो. केवळ त्याचीच गणना ‘जीडीपी’मध्ये होते. अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळेच ‘जीडीपी’चे मोजमाप करण्यासाठी नवीन सूत्र विकसित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ.बजरंगलाल गुप्ता यांनी केले. जास्त उपभोग घेतला तर जास्त मागणी येईल, अशी विकासाची सध्याची व्याख्या सांगते. विकासाची सध्याची व्याख्या वर्तमान समस्यांचे समाधान करु शकत नाही. ‘जीडीपी’च नव्हे तर विकासाच्या व्याख्येसंदर्भात जगभरात संभ्रम आहे.
यामुळेच ‘सुमंगलम्’ या संकल्पनेवर आधारित विकासाचे ‘मॉडेल’ विकसित करुन त्यावर भर देण्याची गरज आहे. ‘सुमंगलम’ या विकासाच्या संकल्पनेत एकात्म दृष्टिकोनदेखील आहे. यात मूलभूत गरजांची पूर्तता, सर्वांचे आरोग्य, संस्कारक्षम व समान शिक्षणाची संधी, सर्वांना रोजगार, प्रत्येकाला घर व सर्वांना सुरक्षा यांचा समावेश होतो. आपल्या देशात अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला. डॉ. विनायक देशपांडे यांनीदेखील यावेळी अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. डॉ.निर्मलकुमार सिंग यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया डेव्हिड यांनी संचालन केले.