फक्त बोर्डावरच ‘नो हॉकिंग झोन’
By admin | Published: March 6, 2016 02:52 AM2016-03-06T02:52:52+5:302016-03-06T02:52:52+5:30
सीताबर्डीतील मुख्य सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची दुकाने लागतात. दुचाकी जायलाही रस्ता उरत नाही.
सीताबर्डीतील दुकानदार आंदोलनाच्या पवित्र्यात : भ्रष्टाचाराचा संकेत देतोय रस्ता
नागपूर : सीताबर्डीतील मुख्य सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची दुकाने लागतात. दुचाकी जायलाही रस्ता उरत नाही. या रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच ‘नो हॉकिंग झोन’ असे बोर्ड लागले आहेत. कोणत्या वेळेत फेरीवाल्यांनी येथे राहू नये, याची वेळही नमूद केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित बोर्ड लागलेल्या भागातच सर्वाधिक हॉकर्सची गर्दी पाहायला मिळते. काही फेरीवाल्यांनी तर या बोर्डावर आपले सामान टांगलेले पाहायला मिळते.
फेरीवाल्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असेलल्या यंत्रणेने या सर्व बाबींकडे डोळेझाक केली आहे. सन २००० मध्ये या रस्त्यावर फलक लावण्यात आले आणि तेव्हापासूनच येथे हॉकर्सची गर्दी वाढत गेली. एक बोर्ड व्हेरायटी चौकात लावण्यात आला. येथे वाहतूक पोलीस उपस्थित राहतात. दुसरा बोर्ड महाजन मार्केटजवळ आहे. मात्र, हा बोर्ड कधीकधीच पाहायला मिळतो. बहुतांश वेळी विक्रेत्यांनी झाकलेला असतो. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे स्थानिक दुकानदार निराश झाले आहेत. न्याय मिळत नसल्यामुळे सीताबर्डी मर्चंट असोसिएशनने आंदोलनाची तयारी चालविली आहे. वाहतूक पोलीस येथे वाहनचालकांवर ‘वन वे’ची कारवाई नियमितपणे करतात, पण फेरीवाल्यांवर कारवाई करताना मात्र दिसत नाही.
आता का शक्य नाही?
पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या कार्यकाळात सीताबर्डीतील मुख्य रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सला हटविण्यात आले होते. तर मग आता कारवाई का होऊ शकत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात नाही. हॉकर्सचे परवाने रद्द करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्याची गरज आहे. जबाबदार अधिकारी व्यक्तिगत स्वार्थापोटी कारवाई करण्यापासून पळवाट शोधत आहेत, असेच चित्र आहे.
- प्रदीप गुप्ता, उपाध्यक्ष, सीताबर्डी मर्चंट असोसिएशन
आता आंदोलनच करू
सीताबर्डीतील दुकानदारांची व्यथा ऐकून त्यांना न्याय देण्यासाठी शासकीय यंत्रणा हस्तक्षेप करण्यास तयार असल्याचे दिसत नाही. व्यापारी शांततेत आपला व्यवसाय करतात, हे कदाचित प्रशासनाला चांगले वाटत नसावे. त्यामुळे आता न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू आहे. इतर व्यापारी संघटनांशी संपर्क साधून कार्यक्रम आखला जात आहे.
- हुसैन नूरअल्लाह अजानी,
संयुक्त सचिव, सीताबर्डी मर्चंट असोसिएशन