१७ नवजात बालकांमागे एकच परिचारिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:07 AM2021-01-10T04:07:22+5:302021-01-10T04:07:22+5:30

नागपूर : अतिदक्षता विभागात २४ तास एक डॉक्टर व प्रत्येकी नवजात बालकांमागे एक परिचारिका असण्याचा नियम आहे. परंतु भंडारा ...

Only one nurse for 17 newborns | १७ नवजात बालकांमागे एकच परिचारिका

१७ नवजात बालकांमागे एकच परिचारिका

Next

नागपूर : अतिदक्षता विभागात २४ तास एक डॉक्टर व प्रत्येकी नवजात बालकांमागे एक परिचारिका असण्याचा नियम आहे. परंतु भंडारा जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात अतिदक्षता कक्षात घटनेच्या दिवशी १७ नवजात बालके उपचार घेत असताना एकही डॉक्टर नव्हता. केवळ एकच परिचारिका कर्तव्यावर होती. त्यातही त्यांनी हा कक्ष बाहेरून बंद केला होता. कक्षात जर कोणी उपस्थित असते किंवा त्यातील बालकांकडे परिचारिका लक्ष ठेवून असत्या तर, ही घटना घडलीच नसती, असे बोलले जात आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नागपूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या छत्तीसगड व मध्य प्रदेशाचे रुग्ण येतात. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने अपघाताचेही रुग्ण याच रुग्णालयात येतात. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय व सात ग्रामीण रुग्णालय येतात. ही सर्व रुग्णालये मिळून ९२७ विविध पदे मंजूर आहेत. यातील ६१० पदे भरलेली असून ३१७ पदे रिक्त आहेत. यात वैैद्यकीय अधिकाऱ्याची १०७ पदे मंजूर असून २९ पदे रिक्त आहेत. दंत शल्यचिकित्सकाचे एक पद असून तेही भरलेले नाही. गट ‘ब’मधील अधिसेविकाचे एक पद मंजूर आहे, परंतु तेही भरण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. अधिपरिचारिकेची २३७ पदे मंजूर आहेत. परंतु यातील ६७ पदे रिक्त आहेत. बालरोग परिचारिकाची स्थायी म्हणून तीन पदे मंजूर असताना यातील एकही पद भरलेले नाही. गट ‘क’मधील परिचारिकांची ४९८ पदे मंजूर असताना १७७ पदे रिक्त आहेत. चतुर्थ श्रेणीमधील ३२२ मंजूर पदापैकी १०८ पदे रिक्त आहेत. यामुळे प्रत्येकावर कामाचा ताण वाढला आहे. या घटनेने रिक्त पदांचा मुद्दाही पुढे आला आहे.

-रात्री १० वाजल्यानंतर नवजात अतिदक्षता कक्षात कुणीच आले नाही

प्रसूती वॉर्डातील एका रुग्णाच्या नातेवाईकाने ‘लोकमत’ला सांगितले, शनिवारी रात्री १० वाजतानंतर विशेष नवजात अतिदक्षता विभागात कुणीच डॉक्टर फिरकले नाही. रात्री परिचारिकेने कक्षाला बाहेरून बंद केले होते. कक्षाच्य आत परिचारिका असत्या किंवा काचेतून त्या बाळावर नजर ठेवून असत्या तर ही घटना घडलीच नसती. ही घटना वरिष्ठांच्या उदासीनतेमुळे घडल्याचेही तो म्हणाला.

Web Title: Only one nurse for 17 newborns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.