दहा पदव्युत्तर विभागात प्रत्येकी एकच शिक्षक; नागपूर विद्यापीठातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 08:21 PM2022-02-02T20:21:05+5:302022-02-02T20:21:48+5:30

Nagpur News कोरोनामुळे ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणाचा खेळ सुरू असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमधील शिक्षकांवरील कामाचा ताण वाढला आहे.

Only one teacher in each of the ten postgraduate departments; Picture from Nagpur University | दहा पदव्युत्तर विभागात प्रत्येकी एकच शिक्षक; नागपूर विद्यापीठातील चित्र

दहा पदव्युत्तर विभागात प्रत्येकी एकच शिक्षक; नागपूर विद्यापीठातील चित्र

Next
ठळक मुद्दे शिक्षकांची तब्बल ५४ टक्के पदे रिक्त

नागपूर : कोरोनामुळे ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणाचा खेळ सुरू असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमधील शिक्षकांवरील कामाचा ताण वाढला आहे. कमी मनुष्यबळातच विद्यापीठाचा कारभार सुरू असून, विद्यापीठाचे पदव्युत्तर विभाग व संचालित महाविद्यालयात शिक्षकांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. ३४ पैकी तब्बल १० पदव्युत्तर विभागांचा कारभार तर अवघ्या प्रत्येकी एकाच शिक्षकाच्या भरवशावर सुरू आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर विद्यापीठाकडे विचारणा केली होती. नागपूर विद्यापीठात शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत, कोणत्या विभागात सर्वात जास्त पदे रिक्त आहेत, याबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. विद्यापीठातर्फे प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार विद्यापीठात शिक्षकांची एकूण ३५० मंजूर पदे आहेत. त्यापैकी केवळ १६१ पदांवर शिक्षक आहेत, तर १८९ जागा रिक्त आहेत. अनेक विभागांचा कारभार तर कंत्राटी शिक्षक व व्हिजिटिंग फॅकल्टीच्या भरवशावर सुरू आहे.

सहयोगी प्राध्यापकांची ६२ टक्के पदे रिक्त

पदव्युत्तर विभाग व संचालित महाविद्यालयांत ‘असिस्टंट प्रोफेसर’ची ४४.२१ टक्के पदे रिक्त आहेत, तर ‘असोसिएट प्रोफेसर’ची ६२ टक्के व ‘प्रोफेसर’ची ७३.५८ टक्के पदे रिक्त आहेत.

या विभागांत एकच शिक्षक

संस्कृत, पाली-प्राकृत, भाषा, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, गांधी विचारधारा, फाईन आर्ट्स, बिझनेस मॅनेजमेन्ट, इलेक्ट्रॉनिक्स, स्टॅटिस्टिक्स या सहा विभागांचा कारभार अवघ्या एकाच पूर्णवेळ शिक्षकाच्या भरवशावर सुरू आहे. आंबेडकर विचारधारा विभागात तर एकही शिक्षक नसल्याचे चित्र आहे. विद्यापीठाच्या ‘फार्मसी’ विभागात शिक्षकांची २३ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ११ पदे रिक्त आहेत.

विद्यापीठातील रिक्त पदे

पदाचे नाव - मंजूर पदे - रिक्त पदे

प्रोफेसर - ५३ - ३९

असोसिएट प्रोफेसर - ८९ - ५६

असिस्टंट प्रोफेसर १९० - ८४

शून्य किंवा एक शिक्षक असलेल्या विभागांमधील आकडेवारी

विभाग - मंजूर - कार्यरत - रिक्त

संस्कृत - ५ - १ - ४

पाली-प्राकृत - २ - १ - १

भाषा - १० - १ - ९

गांधी विचारधारा -२ - १ - १

आंबेडकर विचारधारा - १ - ० - १

समाजशास्त्र - ५ - १ - ४

तत्वज्ञान - ५ - १ - ४

फाईन आर्ट्स - ४ - १ - ३

मायक्रोबायोलॉजी - ६ - १ - ५

स्टॅटिस्टिक्स - ६ - १ - ५

इलेक्ट्रॉनिक्स - १ - १ - ०

Web Title: Only one teacher in each of the ten postgraduate departments; Picture from Nagpur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.