सुरक्षा रक्षकच हाती घेत आहेत कायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:13 AM2021-09-10T04:13:27+5:302021-09-10T04:13:27+5:30
नागपूर : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले ‘महाराष्ट्र सुरक्षा फोर्स’चे (एमएसएफ) जवानच कायदा हातात घेत असल्याने त्यांच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह ...
नागपूर : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले ‘महाराष्ट्र सुरक्षा फोर्स’चे (एमएसएफ) जवानच कायदा हातात घेत असल्याने त्यांच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंगळवारी एका युवकाला ‘एमएसएफ’च्या जवानांनी मारहाण केल्याने हे प्रकरण पोलिसांत गेले आहे.
शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांना सुरक्षा देण्यासाठी व होणारे हल्ले रोखण्याची जबाबदारी ‘एमएसएफ’ची आहे. मेडिकलचे यावर वर्षाला लाखो रुपये खर्च होतात. २४ तास यांची ड्यूटी असतानाही मेडिकलच्या परिसरात चोरीचा घटना व समाजविघातक घटना कमी झालेल्या नाहीत. अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी या जवानांची ड्यूटी मुख्य प्रवेशद्वारावर लावूनदेखील अधिष्ठाता बंगल्यातील चंदनाचे झाड चोरांनी कापून नेले. विशेष म्हणजे, बहुसंख्य जवान कर्तव्यावर असताना आपल्या मोबाइलमध्येच गुंतून राहत असल्याच्याही तक्रारी आहेत. बोटावर मोजण्याइतके जवान सोडल्यास बहुसंख्य जवान रुग्ण किंवा नातेवाइकांशी नीट बोलत नाही, त्यांची वर्तन भांडण करण्यासारखे असल्याचे रुग्ण व नातेवाइकांच्या तक्रारी आहेत. यातूनच ७ सप्टेंबर रोजी युवराज गेडाम नावाच्या युवकाला ‘एमएसएफ’च्या जवानांनी विनाकारण अमानुष मारहाण केली. याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. समता सैनिक दलाच्यावतीने अनिकेत कुत्तरमारे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांना या संदर्भातील निवेदन देऊन जवानावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही समता सैनिक दलाने दिला आहे.
-लसीकरण केंद्रावर दोन सुरक्षा रक्षक!
मेडिकलच्या लसीकरण केंद्रावर ७ सप्टेंबर रोजी ‘एमएसएफ’चा एक जवान तर युनिटी कंपनीचा एक सुरक्षा रक्षक असे दोन जण बसून होते. विशेष म्हणजे, लसीकरणावर गर्दी नसताना, दोन सुरक्षा रक्षक कसे, हा प्रश्न आहे. एकीकडे डॉक्टर, रुग्णांच्या सुरक्षेसाठी जवान कमी पडत असल्याचे ‘एमएसएफ’ म्हणत असताना गरज नसताना तिथे जवान तैनात केले जात असल्याने कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आहे.