ओला, सुका कचरा वेगळा करा, त्याशिवाय नेणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 02:10 PM2021-12-12T14:10:13+5:302021-12-12T14:30:38+5:30
Nagpur News : बुधवारपासून विलगीकृत नसलेला कचरा नागरिकांकडून स्वीकारू नका, असे निर्देश मनपा आयुक्तांनी शनिवारी स्वच्छता विभागाला दिले. सोबतच नागरिकांनी आपल्या घरातील कचरा वेगवेगळा करूनच द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नागपूर : कचरा संकलन करणाऱ्या गाडीत ओला आणि सुका कचऱ्याची वेगवेगळी व्यवस्था केली आहे. बुधवार (१५ डिसेंबर) पासून विलगीकृत नसलेला कचरा नागरिकांकडून स्वीकारू नका, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी स्वच्छता विभागाला दिले. सोबतच नागरिकांनी आपल्या घरातील कचरा वेगवेगळा करूनच द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महापालिका प्रशासनातर्फे ओला आणि सुका कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून स्वच्छतादूताकडे द्यावा, असे आवाहन मनपातर्फे वेळोवेळी करण्यात आले होते. त्यानतंरही काही नागरिकांकडून मिश्रित कचरा दिला जातो. यावर प्रक्रिया करताना अडचणी येतात. त्यामुळे आता सुका आणि ओला असा वेगवेगळा केलेला कचरा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
मनपा क्षेत्रातील सोसायट्या, हॉटेल, व्यापारी संस्था तसेच नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी ओला कचरा प्लास्टिक पिशवीमध्ये न देता ओला व सुका कचरा विलगीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
ओला कचरा : खराब फळे, भाज्या, उरलेले अन्न, अंड्यांचे कवच, नारळ, शहाळी, हाडे अशा विघटन होणाऱ्या बाबीचा समावेश होतो.
सुका कचरा : प्लास्टिक पिशव्या, रबर, थर्माकोल, काचेच्या बाटल्या तसेच काच, बॅटरी सेल, धातू, खिळे अशा गाेष्टींचा समावेश होतो.
घातक कचरा लाल बकेटीत ठेवा
घरोघरी लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती यांच्याकरिता वापरले जाणारे डायपर्स, सॅनिटरी नॅपकीन, बॅटरी सेल, रंगाचे डबे, केमिकल स्प्रे, जंतुनाशके, औषधांच्या रिकाम्या बाटल्या अशा प्रकारचा घातक कचरा वेगळा ठेवा. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. अशा प्रकारचा कचरा लाल रंगाच्या बकेटमध्ये गोळा करण्याचे आवाहन मनपाने केले आहे.