देशात चार लाखांमधून फक्त सात हजार मनोरुग्णांवरच उपचार होतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:48 AM2019-02-04T10:48:47+5:302019-02-04T10:50:50+5:30
एका सर्वेक्षणानुसार देशात चार लाखाहून अधिक मानसिक रुग्ण रस्त्यावर आहेत. आम्ही केवळ आतापर्यंत सात हजार रुग्ण बघितले. या कार्यात प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन‘रमन मॅगसेसे’ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका सर्वेक्षणानुसार देशात चार लाखाहून अधिक मानसिक रुग्ण रस्त्यावर आहेत. आम्ही केवळ आतापर्यंत सात हजार रुग्ण बघितले. भारतीय क्रिकेट संघाला ३०० वर धावा काढण्याचे लक्ष्य असताना सचिन तीन-चार धावांवर बाद होण्यासारखी ही स्थिती आहे. त्यामुळे आम्ही पुरस्कृत करण्यासारखे काही केले नसल्याची भावना व्यक्त करीत, या कार्यात प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन रस्त्यावरील निराधार मनोरुग्णांच्या उपचारासाठी कार्य करणारे ‘रमन मॅगसेसे’ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांनी येथे केले.
‘अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस’(एएमएस)च्या वतीने रविवारी वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर ‘एएमएस’चे अध्यक्ष डॉ. हरीश वरभे, सचिव डॉ. अजय अंबाडे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजू खंडेलवाल, यंग अचिव्हर्स अवॉर्डचे अध्यक्ष डॉ. रमेश मुंडले डॉ. नरेंद्र मोहता व डॉ. एस. एन. देशमुख उपस्थित होते.
डॉ. वाटवानी म्हणाले की, १९९८ साली कैलास मानसरोवर यात्रेची संधी मिळाली. मात्र, त्यावेळी दोन मनोरुग्ण भरती झाल्याने यात्रेला जाण्याचे टळ्ले. त्या प्रवासातील सर्व भाविकांचा अपघाती मृत्यू झाला. मी गेलो असतो तर कदाचित मलाही मृत्यू ओढावला असता.
या घटनेने जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलला. त्यानंतरच्या काळात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता बाबा आमटे यांच्याशी भेट झाली. त्यांच्यातील नि:स्वार्थ भाव बघून रस्त्यावरील मनोरुग्णांसाठी श्रद्धा रिहॅबिलिटेशन केंद्र सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
राजेश खन्नांचे फोटो विकून उदरनिर्वाह
डॉ. वाटवानी म्हणाले, एकदा एक रुग्ण नारळाच्या रिकाम्या कवटीमध्ये गटारातील पाणी पिताना दिसला आणि तेथूनच रस्त्यावरील मनोरुग्णांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली. आम्ही लहान असताना वडील वारल्याने राजेश खन्नांचे फोटो, पुस्तके विकून उदरनिर्वाह करावा लागला. त्या वेदना उराशी असल्याने लोकांबद्दलच्या संवेदना आणखी तीव्र झाल्याचेही ते म्हणाले.
‘एएमएस’तर्फे नवा अभ्यासक्रम - डॉ. वरभे
प्रास्ताविक डॉ. वरभे यांनी केले. त्यांनी ‘एएमएस’तर्फे नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस बोेलून दाखविला. युवा डॉक्टरांना संस्थेशी जुळण्याचे आवाहन केले. डॉ. राजू खंडेलवाल यांनी या वार्षिक परिषदेची विस्तृत माहिती दिली. डॉ. अशोक अरबट आणि डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या कार्यात सुरू झालेल्या या परिषदेला पुढे नेताना आनंद असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी ‘मेंबर डिरेक्टरी’चे विमोचन करण्यात आले.
कृष्णा कांबळे यांना ‘प्रोफेशनल एक्सलन्स पुरस्कार’
मेडिकलच्या कर्करोग विभागाचे प्रा. डॉ. कृष्णा कांबळे यांना प्रोफेशनल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कर्करोगाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला. कर्करोग तज्ज्ञ डॉ. अमोल डोंगरे यांना ‘यंग अचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संचालन डॉ. कल्पना दाते व डॉ. वर्तिका पाटील यांनी केले, तर आभार डॉ. अजय आंबाडे यांनी मानले.