देशाचे संपूर्ण हवाई क्षेत्र नागपुरातून नियंत्रित करण्याची केवळ चर्चाच
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 4, 2024 08:16 PM2024-04-04T20:16:33+5:302024-04-04T20:16:57+5:30
- अधिकारी अनभिज्ञ : डीपीआर तयार करण्यासाठी तज्ज्ञ एजन्सीची नियुक्ती नाही
नागपूर: हवाई वाहतूक व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्यासाठी भारताचे संपूर्ण हवाई क्षेत्र नागपूरविमानतळावरून नियंत्रित करण्याची योजना असून देशातील सर्व चारही विमान माहिती क्षेत्रांना एकत्रित करण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र. या संदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी अनभिज्ञ आहेत.
याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी तज्ज्ञ एजन्सीची मंत्रालय स्तरावर नियुक्ती न झाल्याने ही चर्चा चर्चाच ठरणार काय, अशी शक्यता उड्डयण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
भारत हा आशिया-पॅसिफिक प्रदेशातील प्रमुख हवाई नेव्हिगेशन सेवा देणारा देश आहे. २.८ दशलक्ष चौरस नॉटिकल मैलांवर नियंत्रण ठेवतो. भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार विमान माहिती क्षेत्राचे (एफआयआर) नागपुरातील एका हवाई क्षेत्रामध्ये एकत्रिकरण करण्याची चर्चा दोन वर्षांपासून होत आहे. मात्र प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही, असे मत नाव न सांगण्याच्या अटीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने लोकमतशी व्यक्त केले. मात्र देशातील मध्यवर्ती स्थान असलेल्या नागपुरातील हवाई वाहतूक व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालय मोठ्या हालचालीची योजना आखत असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हवाई वाहतूक क्षमतेच्या दृष्टीने हवाई क्षेत्राचा सर्वात कार्यक्षम वापर करण्यासाठी हवाई मार्गाची रचना आणि क्षेत्राच्या सीमांची सर्वांगीण पुनर्रचना करणे आवश्यक आहे. त्याचा सर्व भागधारकांना फायदा होईल. कमी पृथक्करण आणि इंधन कार्यक्षम उड्डाण मार्गांसह सिंगल स्काय हामोर्नाइज्ड एटीएमचे फायदे असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.