- तरच होईल भाजपशी युती

By admin | Published: November 7, 2016 02:19 AM2016-11-07T02:19:28+5:302016-11-07T02:19:28+5:30

भाजपा व रिपाइं (आठवले) यांची राज्यात युती आहे. स्वत: आठवले केंद्रात राज्यमंत्री आहेत.

Only then will the alliance with the BJP | - तरच होईल भाजपशी युती

- तरच होईल भाजपशी युती

Next

रिपाइं (आ) ला हवे सन्मानपूर्वक जागा वाटप : इतर पर्यायांचाही विचार
आनंद डेकाटे  नागपूर
भाजपा व रिपाइं (आठवले) यांची राज्यात युती आहे. स्वत: आठवले केंद्रात राज्यमंत्री आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत युती करायची की नाही, याचा निर्णय आठवले यांनी स्थानिक नेतृत्वावर सोपविला आहे. गेल्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता यंदा सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच भाजपासोबत युती करायची, अशी ठाम भूमिका स्थानिक नेतृत्वाने घेतली आहे. त्यामुळे नागपूरचा विचार केला असता भाजपा-रिपाइं(आ) यांची युती होणार की नाही, याचा निर्णय सध्यातरी गुलदस्त्यात आहे. युती न झाल्यास रिपाइं आठवले इतर पर्यायांचाही विचार करीत आहे.

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत आठवले यांच्या रिपाइंसोबत भाजपाची युती झाली. तेव्हा ही युती तशी घाईघाईनेच झाली होती. यात शिवसेनासुद्धा होती. नागपूरमध्ये आठवले यांच्या पक्षाला एकूण पाच जागा सोडण्यात आल्या होत्या. परंतु यापैकी काही जागा अशा होत्या ज्या पक्षाने मागितलेल्याच नव्हत्या. या पाचपैकी आठवलेंच्या पक्षाकडून एकमेव सरोज राजू बहादुरे या निवडून आल्या. परंतु ही जागा सुद्धा भाजपाच्या एबी फॉर्मवर लढवली गेली. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्या भाजपाच्या नगरसेविका झाल्या. एक मोमीनपुराची जागा सोडण्यात आली होती. ती मागण्यातच आलेली नव्हती. उत्तर नागपुरातील तीन जागा लढवण्यात आल्या. यात एकही जागा निवडून आली नाही. अशा प्रकारे युतीच्या नावावर भाजपाने रिपाइं (आ)सोबत दगाफटका केला, असा कार्यकर्त्यांचा आरोप असून त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये भाजपाबद्दल नाराजी आहे. यंदाही तसेच घडत असेल तर युती करायचीच कशासाठी, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
नागपूर शहरात एकूण ३० जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असून यापैकी किमान १५ ते २० जागा द्याव्या तसेच ओबीसी व सर्वसाधारण पैकी किमान ५ अशा २५ जागा रिपाइं (आ) ला मिळाव्या, अशी पक्षाची भूमिका आहे. यात थोडाफार बदल होऊ शकेल. परंतु सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच युती करायची, अशी ठाम भूमिका पक्षाने घेतलेली आहे. युती झाली तर ठीक अन्यथा इतर लहान पक्षासोबत आघाडी करून निवडणूका लढवण्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे.

२५ जागा हव्या

युतीसंदर्भात आम्ही आग्रही आहोत. भाजपासोबत अजूनपर्यंत कुठलीही अधिकृतपणे चर्चा झलेली नाही. परंतु मागच्या निवडणुकीतील आमचा अनुभव चांगला नाही. यंदा किमान २५ जागांची आमची मागणी आहे. सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात, यावर आम्ही ठाम आहोत. युती झाली तरी आमचा उमेदवार कुठल्याही परिस्थितीत भाजपचा एबी फॉर्म वापरणार नाही. आम्ही आमच्याच चिन्हावर लढू. तसेच युती न झाल्यास इतर पर्यायांचाही विचार केला जाईल. स्वबळावर लढण्याऐवजी इतर पक्ष व संघटनांसोबत आघाडी तयार करून निवडणूक लढवणार.
- भूपेश थूलकर
प्रदेशाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ)

Web Title: Only then will the alliance with the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.