३१ मेपर्यंत नोंदणी केलेलेच करू शकतील मतदान; जुलै-ऑक्टोबरमध्ये मनपा निवडणुकीचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 12:19 PM2022-06-07T12:19:48+5:302022-06-07T12:21:09+5:30
निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे दिलेले निर्देश विचारात घेता ३१ मे २०२२ पूर्वी मतदार यादीत नाव असलेल्यांनाच या निवडणुकीत मतदान करता येईल. जुलै-ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुका होण्याचे संकेत आहे.
नागपूर : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ७ जुलैला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. यासाठी ३१ मेपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांनाच या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
नागपूरसह राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. १७ जून रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल. यावर २५ जूनपर्यंत आक्षेप नोंदविता येतील. प्रभागनिहाय अंतिम यादी घोषित केल्यानंतर बूथ निहाय मतदार यादी घोषित केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे दिलेले निर्देश विचारात घेता ३१ मे २०२२ पूर्वी मतदार यादीत नाव असलेल्यांनाच या निवडणुकीत मतदान करता येईल. जुलै-ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुका होण्याचे संकेत आहे.
ओबीसी आरक्षण व कोविडमुळे निवडणुका लांबणीवर
राज्यातील काही महापालिकांचा कार्यकाळ मे २०२० आणि जून २०२० रोजी संपला होता. त्यानंतर मार्च-एप्रिल२०२२ मध्ये काही महापालिकांचा कार्यकाळ संपला. याचा विचार या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र मात्र ओबीसी आरक्षण व कोविड संक्रमणामुळे या महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. न्यायालयाच्या निर्देशाचा विचार करता ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
प्रभाग रचनेवर ६ आक्षेप
महापालिकेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत ३१ मे रोजी काढण्यात आली. यावर ६ जूनपर्यंत आक्षेप स्वीकारण्यात आले. मनपाच्या निवडणूक विभागाकडे सोमवारपर्यंत ६ आक्षेप प्राप्त झाले. यात प्रभाग् ४ मध्ये दोन आक्षेप असून अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागेवर आक्षेप नोंदविलेला आहे. तर एका प्रभागात महिला आरक्षणाला विरोध दर्शविला आहे. झोननिहाय आक्षेपाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याने यात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
३१ मे २०२२ पर्यंतची मतदार यादी गृहीत धरणार
१७ जून प्रारूप मतदार यादी
२५ जूनपर्यंत मतदार यादीवर आक्षेप
७ जुलै प्रभागनिहाय अंतिम यादी