महिलाच क्रांती घडवू शकतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:54+5:302021-07-08T04:06:54+5:30
महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत नवी आशा, नवी दिशा नीलिमा बावणे नागपूर : महिला स्वयंरोजगार करून स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या ...
महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत
नवी आशा, नवी दिशा
नीलिमा बावणे
नागपूर : महिला स्वयंरोजगार करून स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. कोरोनाकाळात महिलांनी गृहोद्योग करून त्याचा परिचय दिला आहे. कल्पतरू महिला औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी प्रशिक्षणातून रोजगार निर्मितीवर नेहमीच भर दिला आहे. कोरोनाकाळातही वेबिनारच्या माध्यमातून गृहोद्योगाचे प्रशिक्षण दिले आहे. महिला चटणी, लोणचे, पापड, रूचकर अन्न तयार करून पॅकिंगचा उद्योग करीत आहेत. महिलांनी स्वयंरोजगार उभारून स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्यात, हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे. महिलाच क्रांती घडवू शकतात, असे मत नीलिमा बावणे यांचे आहे.
नीलिमा बावणे दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि कल्पतरू महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा आहेत. सन २०१२-१७ या काळात प्रभाग (५५) आरपीटीएस या भागाच्या नगरसेविका, लक्ष्मीनगर झोनच्या माजी सभापती, नारी निकेतन महिला क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या संचालक, देवता फाउंडेशनच्या संचालिका, शिवालय सुकळी परिवारच्या संचालिका, राज्य महिला महासंघ, पुणेच्या सचिव असून, महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी बचत गटाची स्थापना केली आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिलांनी आरोग्याबाबत दक्ष राहावे, स्वत:बद्दल जागरूक राहावे, आरोग्य, आहाराचा विचार करावा, एखादा छंद जोसावा, असे त्यांचे मत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची त्यांची धडपड आहे. महिला अनेक गोष्टींतून समाजाला नवीन दिशा देण्याचे काम करू शकतात.
नीलिमा बावणे म्हणाल्या, निसर्ग आणि महिला यांचे दृढ नाते आहे. आयुर्वेदाला पूरक उद्योग करायला पाहिजे. आयुर्वेद उत्पादनाला देश-विदेशात मागणी आहे. योगा, प्राणायाममध्येही महिला करिअर करू शकतात. महिला क्रांती करून नवीन इतिहास घडवू शकतात. आता शिकलेल्या मुली आणि महिलांनी चांगले काम करीत आहेत. ग्रामीण भागातील महिला होतकरू असतात. आत्मनिर्भर भारतात महिलांचा आत्मसन्मान होणे आवश्यक आहे. पण त्यांना थोड्या प्रशिक्षणाची गरज आहे. संस्थेने कोरोनाकाळात अनेक उपक्रम राबविले. कचरा व्यवस्थापन, किचन गार्डन संकल्पना रूजविली. महिला नर्सरी चांगल्या तयार करू शकतात. कोरोनाकाळात मास्क बनवून विक्री, बर्थ डे केक तयार करून महिलांनी विक्री केली. १२ वर्षे जुन्या संस्थेशी २५० पेक्षा जास्त महिला जुळल्या आहेत. सुकलेल्या भाज्या, शेतकऱ्यांच्या अतिरिक्त भाज्या सुकवून पॅकिंग करून विक्री करण्याचे प्रशिक्षण महिलांना दिले आहे. प्रशिक्षणामुळे या महिलांमध्ये एक नवीन ऊर्जा, आत्मविश्वास निर्माण होऊन त्या आर्थिकबाबतीत सक्षम बनतील, अशी खात्री आहे. याकरिता संस्था महिलांना सर्वांगीण मदत करीत आहे. उत्पादक आणि खरेदीदार यांची साखळी तयार करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. महिलांसाठी अनेक स्टार्टअप व्यवसाय आहेत. अशा उद्योगाची संस्थेच्या माध्यमातून नोंदणी करण्यात येत आहे.
नीलिमा बावणे म्हणाल्या, कोरोनाकाळात दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चांगले काम केले आहे. आपला परिवार, आपली संस्था या बीद्रवाक्यानुसार कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ सभासदांना घरपोहोच सेवा दिली आहे. औषधे आणि धान्याच्या किट दिल्या. त्यांची विचारपूस करण्यासाठी फोन केले. दुसऱ्या लाटेत सभासदांची आरोग्यविषयक काळजी घेतली. २४ तास सेवा दिली. राष्ट्रीयीकृत बँका करू शकत नाही, ते काम संस्थेने केले. कर्मचाऱ्यांचाही आरोग्य विमा केला. भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना संस्थेने आर्थिक मदत दिली. संस्था संकटकाळात कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली.
संस्थेने सहा वर्षांपूर्वी खामला शाखेत सहा महिने कालावधीचा थेअरी व प्रॅक्टिकल आधारित बँकिंग पॉइंट कोर्स सुरू केला असून, त्यातून बँकिंग ज्ञान दिले जाते. दरवर्षी तीन आणि सहा महिन्यांचे प्रशिक्षण आहे. प्रशिक्षित हुशार विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरी दिली. पुढे सर्व व्यवहार बँकिंगच्या माध्यमातून होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक महिलेला बँकिंग ज्ञान आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येते. या कोर्सच्या माध्यमातून जवळपास चार हजार मुले-मुली बँकिंगमध्ये तयार झाल्या आहेत.
सात वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या देवता फाउंडेशन अंतर्गत कोरोनाकाळात मास्क, सॅनिटायझर व धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. शाळा सुटलेल्यांना शिकविण्याचा प्रयत्न आहे. परसोडी व पांढराबोडी झोपडपट्टीत मुलांना पेंटिंग, योग व आरोग्यविषयक प्रशिक्षण दिले आहे. मुलामुलींना खेळण्याचे साहित्य दिले आहे. किशोर बावणे संस्थेचे अध्यक्ष तर कस्तुरी बावणे उपाध्यक्षा आहेत. संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शिबिर राबवून रक्ताच्या १ लाख पिशव्या गोळा करण्यात येणार असून, प्रारंभ २ ऑक्टोबरपासून होणार आहे. फाउंडेशनचे काम दिवसेंदिवस विस्तारत आहे.
दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला १७ जून २००९ ला मल्टिस्टेटचा दर्जा मिळाला. महिलांनी महिलांसाठी सुरू केलेली भारतातील पहिल्या क्रमांकाची मल्टिस्टेट संस्था म्हणून गौरव झाला आहे. मुख्य कार्यालयासह संस्थेच्या २९ शाखा असून, पुणे आणि इंदूर येथेही शाखा आहेत. संस्थेने यशस्वीतेची २७ वर्षे पूर्ण केली असून, १३०० कोटींच्या ठेवी आणि २१०० कोटींचा व्यवसाय आहे. जवळपास २७० महिला कर्मचारी कार्यरत आहेत. एकाच छताखाली सर्व प्रकारच्या अद्ययावत सेवा उपलब्ध आहेत. पुढे सहकार आणि बँकिंग क्षेत्राला चांगले दिवस येणार आहे. ग्राहकांनी बदल स्वीकारला पाहिजे. मंदी नाही तर संधी म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. कोरोनाकाळात संस्थेच्या ठेवी आणि व्यवसाय वाढलाच आहे. महिलांचा स्वभाव बचतीचा असतो. भीशीच्या स्वरुपात ४० महिलांनी सुरू झालेल्या संस्थेचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. संस्थेचे एक लाखावर सदस्य असून, त्यात ७५ टक्के महिला आहेत. मोठा वर्ग संस्थेशी जुळला आहे. महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले. त्यांच्या लघु उद्योगाला मदत केली आहे.
नीलिमा बावणे म्हणाल्या, महिला नेहमीच समाज आणि कुटुंबाच्या केंद्रस्थानी असाव्यात आणि त्यांनी लहानसहान उद्योग करून आत्मविश्वासाने कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा, असा नेहमीच प्रयत्न आहे. महिलांनीही स्वत:च्या पायावर उभे राहून एक यशस्वी उद्योजिका म्हणून समाजात मानाचे स्थान मिळवावे. याकरिता महिलांना गरज आहे कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि समर्पणाची.
(आरसीआय)