ओपीडी घटली, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 09:17 PM2020-06-05T21:17:50+5:302020-06-05T21:19:45+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मेयो, मेडिकलच नाहीतर महानगरपालिकेचे दवाखाने, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. याचा परिणाम, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर होत असल्याचे समोर आले आहे. याचा नुकताच आढावा आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यांच्यानुसार मार्च व एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला काहीसा परिणाम झाला, परंतु आता सुरळीत होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मेयो, मेडिकलच नाहीतर महानगरपालिकेचे दवाखाने, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. याचा परिणाम, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर होत असल्याचे समोर आले आहे. याचा नुकताच आढावा आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यांच्यानुसार मार्च व एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला काहीसा परिणाम झाला, परंतु आता सुरळीत होत आहे.
सर्वच शासकीय रुग्णालयांमधून राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रम, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, साथरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अशा विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतून आजारांचे निदान व उपचार केले जातात. या कार्यक्रमात दरवर्षी जिल्ह्यांना लक्ष्य दिले जाते. परंतु मार्चपासून कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. ‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. यातच ग्रामीण व मनपाच्या डॉक्टरांसह, परिचारिका व कर्मचाऱ्यांची क्वारंटाईन सेंटर, चेक पोस्ट, कोविड सेंटर येथे ड्यूटी लावण्यात आली. यामुळे ज्यांच्याकडे जे कार्यक्रम होते, त्यावर परिणाम झाला आहे. यातच लॉकडाऊन व कोरोनाच्या भीतीमुळे ओपीडीत रुग्णसंख्येत घट झाल्याचाही प्रभाव राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर पडला. या सर्वांचा आढावा घेण्याच्या सूचना संचालकांनी दिल्या होत्या. त्यानुसार, आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांना भेटी देऊन सध्याच्या स्थितीची माहिती घेतली आहे.
सुरुवातीला प्रभाव पडला, परंतु आता सुरळीत होत आहे
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार यांनी सांगितले, लॉकडाऊन व कोरोनाच्या भीतीमुळे ओपीडीत रुग्णांची घट झाली आहे. यामुळे मार्च महिन्यात व एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला काहीसा परिणाम, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर पडला. परंतु आता सर्व कार्यक्रम सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. विशेषत: लसीकरण, जोखमीच्या मातांना मदत या कार्यक्रमांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. कुष्ठरोग व क्षयरोगाच्या रुग्णांना घरी जाऊन औषधांचे वाटप केले जात आहे.