‘सुपर’ ची ओपीडी म्हणजे गोंधळ ‘स्पेशल’
By Admin | Published: October 19, 2016 03:12 AM2016-10-19T03:12:43+5:302016-10-19T03:12:43+5:30
रुग्णांची वाढती संख्या व रुग्ण हिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विभागांच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) दिवस नुकतेच बदलविण्यात आले.
अपुरी जागा ठरत आहे कारण : रुग्णसंख्येतही दुपटीने वाढ
नागपूर : रुग्णांची वाढती संख्या व रुग्ण हिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विभागांच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) दिवस नुकतेच बदलविण्यात आले. तसेच सोयीसाठी ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. नोंदणी कक्षाची रांग, तपासणीच्या प्रतीक्षेत बसलेले रुग्ण आणि औषधे घेणाऱ्यांची रांग एकाच ठिकाणी लागत असल्याने गोंधळ उडत आहे. याचा फटका गंभीर रुग्णांना बसत आहे. बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण व व्यसनाधिनतेमुळे विशेषत: हृदय, मेंदू व किडनी विकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. याचा भार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवरही पडला आहे. सध्याच्या स्थितीत या रुग्णालयातून हृदयशल्य चिकित्साशास्त्र, (सिव्हीटीएस), हृदयरोग (कार्डिओलॉजी), मेंदूरोग (न्यूरोलॉजी), मज्जातंतूची शल्यक्रिया (न्यूरोसर्जरी), किडनीविकार (नेफ्रालॉजी), मूत्रपिंडरोग (युरोलॉजी) व पोटाचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी), एन्डोक्रेनॉलॉजी (मधुमेह) अशा आठ विभागातून रुग्णसेवा दिली जाते. रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेऊन व रुग्ण हिताच्या दृष्टीने आठही विभागाचे ओपीडीचे दिवस बदलविण्यात आले. ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आला. परंतु गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याने ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. एकाच ठिकाणी रुग्णांची गर्दी वाढल्याने कुणाचा नंबर आला याची माहिती रुग्णांपर्यंत पोहचत नाही. परिणामी, रुग्णारुग्णांमध्ये भांडणे वाढली आहेत. गंभीर रुग्णांना याचा फटका बसत आहे. डॉक्टरही या गोंधळामुळे त्रासले असून ओपीडीमध्ये महत्त्वाचे बदल करणे आवश्यक असल्याचे बोलत आहे. (प्रतिनिधी)