उपराजधानीत राजरोस खेळला जातो लाखोंचा जुगार; पोलीस गप्प का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:02 AM2018-04-11T10:02:04+5:302018-04-11T10:02:17+5:30
विविध अवैध धंद्यांची बजबजपुरी झालेल्या उपराजधानीत जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट झाला आहे. प्रारंभी शहराच्या विविध भागातील झोपडपट्ट्या आणि गल्लीबोळात चालणारा जुगार आता बिनबोभाटपणे शहराच्या मध्यवर्ती भागात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी चालतो.
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विविध अवैध धंद्यांची बजबजपुरी झालेल्या उपराजधानीत जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट झाला आहे. प्रारंभी शहराच्या विविध भागातील झोपडपट्ट्या आणि गल्लीबोळात चालणारा जुगार आता बिनबोभाटपणे शहराच्या मध्यवर्ती भागात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी चालतो. गोकुळपेठ मार्केटमध्ये चालणाऱ्या अशाच एका चेंगड (बाजार) अड्ड्याची व्हिडिओ क्लीप लोकमतच्या हाती लागली आहे.
गोकुळपेठ - धरमपेठ हा परिसर वेगवेगळ्या पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. या भागात बाजारपेठ, खाद्यपदार्थ, फुलाफळांपासून भाजीपर्यंत आणि शालेय साहित्यांपासून तो खेळाच्या साहित्यापर्यंत सर्वच उपलब्ध आहे. बाजारपेठेसोबतच शाळा, कॉलेज, शासकीय निमशासकीय कार्यालये, जीम, सिनेमागृह, मॉल, रुग्णालये आणि बार तसेच वाईन शॉपही आहेत. त्यामुळे या भागात भल्या सकाळीपासून उशिरा रात्रीपर्यंत वर्दळ असते. ते ध्यानात घेत समाजकंटकांनीही या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू झाले. गोकुळपेठच्या बाजारात प्रारंभी लपूनछपून गावठी दारू विकली जायची. त्यानंतर सट्टा (मटका) अड्डा सुरू झाला. तोही लपूनछपूनच चालायचा. तेथे जोरदार धंदा होत असल्याने गुंडांच्या दोन टोळ्या या बाजारपेठेत एकमेकांच्या विरोधात उतरल्या. त्यातूनच या बाजारात दोन वर्षांपूर्वी सचिन सोमकुंवर नामक गुंडांची भरदिवसा सिनेस्टाईल हत्या झाली होती. त्यानंतर पोलिसांनी या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केल्याने अवैध धंदे काही वेळेसाठी बंद झाले. आता तेथे अवैध धंद्यांना उधाण आले आहे. दिवसरात्र मटका सुरू असतो. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत खुलेआम चेंगड (जुगार अड्डा) चालतो. आठ तासात येथे लाखोंची हारजीत होते. एक दोघांचे खिसे भरले जातात तर अनेक जण कंगाल होऊन घराकडे परतात. हा जुगाराचा अड्डा अंबाझरी ठाण्यातील पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे सुरू आहे. या जुगार अड्डयाकडे दुसऱ्या पोलीस अधिका-यांचे का लक्ष जात नाही, असा प्रश्न आहे. अंबाझरीतील वरिष्ठ पोलीस अधिकारी एसीसपी, डीसीपी पथकातील मंडळी आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही हा अड्डा दिसू नये, ही बाब आश्चर्य वाढवणारी आहे. पोलिसांच्या नेटवर्कचीही यातून प्रचिती यावी! शहराच्या विविध भागात अशा प्रकारचे जुगार अड्डे बिनबोभाट सुरू दिसतात, हे विशेष!
एक तीर, कई निशाने
जुगार अड्ड्यावरील कारवाई दाखवण्यासाठी पोलीस शे-दोनशे रुपये घेऊन बसलेल्या जुगाऱ्यांची धरपकड करतात. दहा जुगारी पकडले आणि रोख दोन ते तीन हजार रुपये तसेच मोबाईल, दुचाक्या वा असेच दुसरे साहित्य मिळून एक ते दीड लाखांचा मुद्देमाल पकडल्याची चढवून बढवून माहिती देतात. यातून संबंधित भागाच्या ठाण्यातील पोलीस एक तीर, कई निशानेची करामत करतात. ही छुटपूट कारवाई करून घेताना वरिष्ठांना आम्ही अवैध धंद्यांविरोधात सक्रिय असल्याचे दाखविले जाते. दुसरीकडे वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळवून घेता येते आणि लाखोंची हारजीत चालणारांना हप्ता वाढविण्यासाठी इशाराही दिला जातो. संबंधितांचे याकडे लक्ष वेधल्यास पोलीस जुगार अड्डेवाल्याला काही दिवस ‘चेंगड बंद’ चा सल्ला देऊन आमच्याकडे असे काहीच नाही, हे दाखवतात.
अनेकांची ‘दुवा’, अनेकांना ‘दवा’
या जुगारअड्ड्याला पोलिसांसकट अनेकांची दुवा (आशीर्वाद) आहे. त्यामुळे चेंगड चालविणारा दिवसभरात हजारो रुपये कमवितो आणि संबंधित सर्वांना ‘दवा’ म्हणजेच त्यांचा त्यांचा हिस्सा देतो. त्यामुळे या अड्ड्यावर ना पोलिसांचा छापा पडत, ना अड्डा चालविणारावर कारवाई होत. लोकमतकडे या अड्ड्यावर चालणाऱ्या जुगाराची व्हिडीओ क्लीप आहे. त्यात पैशाची कशी हार जीत केली जाते, ते दिसून येते.