लेव्हल-१ अंतर्गत मार्केट खुले करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:16+5:302021-06-11T04:07:16+5:30
नागपूर : नागपूर जिल्ह्यात लेव्हल-१ च्या सुविधा प्रदान करतानाच संक्रमण कमी झाल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची औषधविक्रेत्यांना परवानगी देण्याची मागणी करणारे ...
नागपूर : नागपूर जिल्ह्यात लेव्हल-१ च्या सुविधा प्रदान करतानाच संक्रमण कमी झाल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची औषधविक्रेत्यांना परवानगी देण्याची मागणी करणारे निवेदन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना दिले.
चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, राज्य शासन सरकारने ७ जूनपासून संक्रमण आणि उपलब्ध रिक्त खाटांच्या आधारावर लेव्हल-१, लेव्हल-२, लेव्हल-३ आणि लेव्हल-४ मध्ये जिल्ह्यांना वर्गीकृत करून अनलॉकचे दिशानिर्देश जारी करून परिस्थितीच्या आधारावर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु, स्थानिक प्रशासनाने नागपूर शहर लेव्हल-१ मध्ये असल्यानंतरही लेव्हल-३ चे निर्बंध लावले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचा रोष आहे. शासनाने एप्रिलपासून संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावले होते, परंतु नागपूर शहरात व्यापारी मार्चपासूनच लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान सोसत आहेत. मेपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात नागपुरात १.५ ते १.८ टक्के रूग्ण मिळत आहेत आणि रिकव्हरी दर ९८ टक्के आहे.
चेंबरचे उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल म्हणाले, राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार प्रशासनाने साप्ताहिक समीक्षा करून सोमवार, १४ जूनपासून व्यापाऱ्यांना लेव्हल-१ च्या सुविधा देऊन आर्थिक व्यवहार करण्याची परवानगी द्यावी. त्याकरिता अधिकारी व व्यापाऱ्यांची समिती बनवावी. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या समस्या प्रशासनासमोर येतील. याशिवाय, शहरात संक्रमण वाढू नये म्हणून घरीच उपचार करणारे कोरोना रुग्ण घराबाहेर पडणार नाहीत, यावर लक्ष द्यावे.
चेंबरचे सचिव रामअवतार तोतला म्हणाले, प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शन वितरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सध्या नागपुरात संक्रमण कमी झाले असून त्याच्या विक्रीचे अधिकार औषध विक्रेत्यांना द्यावे. अनेकांकडे हे इंजेक्शन उपलब्ध आहेत, पण विक्री करता येत नाही. त्याची मुदत ऑगस्ट वा सप्टेंबर आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या जिल्ह्यांना हे इंजेक्शन उपलब्ध होतील. निवेदन देताना चेंबरचे सहसचिव उमेश पटेल, स्वप्निल अहिरकर व जनसंपर्क अधिकारी राजवंतपाल सिंग तुली उपस्थित होते.