प्रभागात जनसंपर्क कार्यालय उघडा
By admin | Published: March 29, 2017 02:56 AM2017-03-29T02:56:55+5:302017-03-29T02:56:55+5:30
महापालिकेत मिळालेल्या एकतर्फी विजयाने भारावून न जाता नगरसेवकांना सक्रिय व जनसंपर्कात
भाजपचे नगरसेवकांना निर्देश : कार्यपद्धतीची घेणार स्वतंत्र नोंद
नागपूर : महापालिकेत मिळालेल्या एकतर्फी विजयाने भारावून न जाता नगरसेवकांना सक्रिय व जनसंपर्कात ठेवण्यासाठी भाजपाने कडक पावले उचलली आहेत. निवडणुकीनंतर नगरसेवकांनी विजयाचा आनंदोत्सव साजरा करीत घरी शांत बसून न राहता जनतेच्या कामासाठी सक्रिय राहावे, याची काळजी पक्षातर्फे घेतली जात आहे. प्रत्येक नगरसेवकाने प्रभागात जनसंपर्क कार्यालय सुरू करावे व त्याचा अहवाल पक्षाकडे सादर करावा, असे निर्देश पक्षातर्फे देण्यात आले आहेत.
६ एप्रिल रोजी भाजपाचा ३७ वा स्थापना दिवस आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवकांसाठी एकप्रकारे आचारसंहिताच जारी करण्यात आली. महापालिकेची निवडणूक आटोपली असली तरी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपचे नगरसेवक कुठेच दिसत नाही, असा संदेश जाता कामा नये. यासाठी प्रत्येक नगरसेवकाने प्रभागात जनसपंर्क कार्यालय उघडा. एका निश्चित वेळेत नगरसेवक जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध असला पाहिजे. तेथे जनतेची गाऱ्हाणी ऐकून घ्या, त्यांच्या समस्यांचे निवेदन स्वीकारा. या माध्यमातून जनसंपर्क कायम ठेवा. लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत तुमच्या प्रभागातील मताधिक्य कमी होऊ नये, असा सूचक इशाराही नगरसेवकांना देण्यात आला.
पक्षाच्या बैठकीचे निमंत्रण मिळाल्यानंतर प्रत्येक नगरसेवकाने उपस्थित राहणे बंधनकारक आहे. बैठकीला येणे शक्य नसेल तर तसे कारण कळवावे लागेल. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा नगरसेवकांना देण्यात आला. संघटनात्मक कामात कमी पडू नका, पक्षातर्फे सोपविण्यात येणाऱ्या मोहिमेत पुढाकार घ्या, संघटनात्मक प्रत्येक कामाची दखल घेतली जाईल. प्रत्येकाने पक्षासाठी केलेल्या कामाची स्वतंत्र नोंद ठेवली जाईल, असेही नगरसेवकांना स्पष्ट करण्यात आले. महापालिकेची सभा, स्थायी समितीची सभा, झोन समितीची सभा किंवा कुठल्याही विषय समितीच्या सभेला नियोजित वेळेवर पोहोचा. दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.(प्रतिनिधी)
नाराजांना मनविण्याची जबाबदारी नगरसेवकांवर
महापालिकेच्या निवडणुकीत एकाला तिकीट मिळाले. त्यामुळे चार इच्छुक नाराज झाले. आता या नाराज कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी संबंधित नगरसेवक व पराभूत उमेदवारांवर सोपविण्यात आली आहे. नगरसेवकांनी नाराज पदाधिकारी, कार्यकत्याची भेट घ्यावी. त्यांना पक्षाच्या कार्यक्रमांसाठी सन्मानपूर्वक निमंत्रित करावे. त्यांना सोबत घेऊन प्रभागाची संघटनात्मक आखणी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
स्थापना दिवशी उभारणार लोकसभेच्या प्रचाराची गुढी
६ एप्रिल रोजी भाजपाचा ३७ वा स्थापना दिन आहे. या दिवशी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची गुढी उभारण्याची तयारी भाजपाने चाालविली आहे. या निमित्त सर्व ३८ प्रभागांमध्ये स्वतंत्र कार्यक्रम घेतले जाणार आहेत. सकाळी टिळक पुतळा, महाल येथील कार्यालयात ध्वजवंदन होईल. सायंकाळी प्रत्येक प्रभागात स्वतंत्र झेंडावंदन व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला जाईल. या सोहळ्यात प्रभागातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी यांनाही निमंत्रित केले जाणार आहे.