सलामीच्या झुंजीत बुकींची फटकेबाजी
By Admin | Published: March 16, 2016 08:39 AM2016-03-16T08:39:49+5:302016-03-16T08:39:49+5:30
यजमान भारत आणि न्यूझीलंडच्या दरम्यान जामठ्याच्या मैदानावर रंगलेल्या सलामीच्या झुंजीत नागपुरातील बुकींनी जोरदार
नरेश डोंगरे ल्ल नागपूर
यजमान भारत आणि न्यूझीलंडच्या दरम्यान जामठ्याच्या मैदानावर रंगलेल्या सलामीच्या झुंजीत नागपुरातील बुकींनी जोरदार फटकेबाजी करीत ५०० ते ६०० कोटींची खायवाडी केल्याची चर्चा आहे.टी-२० क्रिकेटच्या रणसंग्रामात मंगळवारी सलामीची झुंज भारत आणि न्यूझीलंडच्या संघात झाली. बुकींनी खायवाडीची आधीच तयारी करून ठेवली होती. त्यामुळे पहिल्या चेंडूवरील षटकार आणि दुसऱ्या चेंडूने उडवलेली दांडी बुकींना लाखोंची धडाकेबाज सुरुवात करून देणारी ठरली. त्यानंतर बुकी बाजार कमालीचा गरम होत गेला. बुकींच्या हायटेक अड्ड्यावरील मोबाईल नॉनस्टॉप खणखणू लागले. पहिला डाव संपला त्यावेळी बुकी बाजारात ३०० कोटींच्या वर खायवाडी झाली, असे संबंधित वर्तुळात बोलले जात होते.
खायवाडी करणारे अनेक बुकीं देश-विदेशात कटींग (खायवाडीची बड्या बुकींकडे लगवाडी) करण्यात गुंतले होते. त्यामुळे नागपूरच्या सट्टा बाजाराच्या लाईन एका फोनवरून थेट तीन तिसऱ्या फोनवर डायव्हर्ट होत होत्या. गोवा, बँकॉक, दुबईत कटिंग (उतारी) होत होती. पोलीस या लाईनचा छडा लावण्याचे प्रयत्न करीत होते. मात्र, वृत्त लिहिस्तोवर त्यांना कोणत्याही अड्ड्याचा छडा लागला नव्हता.
विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांनी चार वर्षांपूर्वी उघड केलेल्या फिक्सिंग प्रकरणात श्रीशांत, विंदू दारासिंगसह नागपुरातील सुनील भाटिया, छोटू अग्रवाल, मुन्ना डोले या बुकींसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते.
त्यामुळे येथील बुकी आणि सट्टाबाजाराच्या धक्कादायक नेटवर्कचा खुलासा झाला होता. त्यानंतर बुकींच्या या वजनदार नेटवर्कला एक प्रकारे मूक मान्यता मिळाल्यासारखी झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या सिझनमध्ये उपराजधानीतील सट्टा बाजार देश-विदेशातील बुकींसाठी ‘हॉट मार्केट‘ ठरला. या पार्श्वभूमीवर, आयसीसी टी-२० च्या क्रिकेट संग्रामासाठी स्थानिक बुकींनी विविध ठिकाणी लाईन देऊन ठेवली होती.
फिक्सरच्या लाईनवर भागीदारांचा कब्जा
४सध्याच्या स्थितीत बुकी बाजारात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या. त्यातील एक म्हणजे, तब्बल अडीच हजार कोटींची क्रिकेट मॅच फिक्स करणारा आंतरराष्ट्रीय बुकी सुनील भाटिया याला ऐन हंगामाच्या तोंडावर पोलिसांनी जेरबंद केले. त्यामुळे त्याच्या निराधार झालेल्या लाईनवर त्याच्याच पूर्वाश्रमीच्या भागीदारांनी कब्जा केला आहे. तो कोठडीत असल्याने त्याच्या साऱ्या पंटर्सना आपल्याकडे वळवून छोटू-रम्मूच्या जोडीने सट्टा मार्केटवरील पकड घट्ट केली आहे.
भंडाऱ्यात कंट्रोल रूम
४एका सामन्यावर शेकडो कोटींच्या सट्ट्याचा खेळ करणाऱ्या बुकींनी नागपूर शहर, आजूबाजूचा परिसर, कामठी, बुटीबोरी, बेला, बेसा, वाडी या भागांसह मौदा, लाखनी, तुमसर, गोंदियातही हायटेक अड्डे सुरू केले आहे. सुरक्षित अन सेफ मानला जाणाऱ्या जवाहरनगर, भंडाऱ्यात कंट्रोल रुम सुरू केल्याची खास सूत्रांची माहिती आहे. आज सकाळपासूनच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बुकींचे नेटवर्क शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, हे विशेष !