नागपुरात इंडस्ट्रीयल बर्फाची बाजारात सर्रास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:22 AM2018-05-16T01:22:51+5:302018-05-16T01:23:03+5:30
आजाराला आमंत्रण देणाऱ्या इंडस्ट्रीयल म्हणजे अखाद्य बर्फाची बाजारात सर्रास विक्री सुरू आहे. उन्हाळ्यात लग्नसमारंभात पिण्याच्या पाण्यात हा बर्फ टाकण्यात येत आहे. या अवैध प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असून कारखाने वा विक्रेत्यांवर अजूनही कारवाई केलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजाराला आमंत्रण देणाऱ्या इंडस्ट्रीयल म्हणजे अखाद्य बर्फाची बाजारात सर्रास विक्री सुरू आहे. उन्हाळ्यात लग्नसमारंभात पिण्याच्या पाण्यात हा बर्फ टाकण्यात येत आहे. या अवैध प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असून कारखाने वा विक्रेत्यांवर अजूनही कारवाई केलेली नाही.
उन्हाळ्यात चौपाटीवरील खाद्यान्नाच्या हातठेल्यावर अखाद्य बर्फाचा सर्रास उपयोग करण्यात येत आहे. आईसगोळा याच बर्फापासून तयार करून त्यावर रासायनिक रंग टाकण्यात येतो. चवीने खाणाऱ्या लहान मुलांसह वयस्कांना या बर्फाने आजार केव्हा होतो, हे कळत नाही. अखाद्य बर्फ लगेच ओळखता यावा म्हणून त्याला निळसर रंग देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या संदर्भात अध्यादेशही काढले आहेत. त्याची अंमलबजावणी १ जूनपासून होणार आहे. पण ट्रायल म्हणून नागपुरातील कोणत्याही बर्फ कारखान्यांनी इंडस्ट्रीयल बर्फाला निळसर रंगात देऊन विक्रीस आणले नाहीत. बाजारात अजूनही अखाद्य बर्फाचा थेट खाद्य बर्फ म्हणून उपयोग होत आहे.
उन्हाळ्यात बर्फाची सर्वाधिक विक्री होते. मूळात क्यूब आकारात येणारा पारदर्शक बर्फ खाद्य म्हणून उपयोग येतो. अशा प्रकारचा बर्फ तयार करणारे कारखाने नागपुरात कमी आहेत. पण इंडस्ट्रीयल म्हणजेच अखाद्य बर्फ मोठ्या लाद्यांमध्ये बाजारात विक्रीस येतो. नियमानुसार या बर्फाची विक्री अवैध आहे. पण बाजारात मोठ्या लादीचे तुकडे करून ग्राहकांना विकण्यात येत आहे. या बर्फामुळे गंभीर आजारही होऊ शकतात. अखाद्य बर्फ अशुद्ध पाण्यापासून तयार करण्यात येतो. त्यामुळे तो खाण्यायोग्य नाही. असे असतानाही विभागाकडून कारवाई शून्य आहे. या संदर्भात अनेक तक्रारी विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत. या अखाद्य बर्फाचा उपयोग मृतदेह शीत ठेवणे, वस्तूंची साठवणूक आणि वाहतुकीसाठी वापरलेल्या बर्फाचा खाद्यपदार्थांसाठी संपर्क येऊ नये, असे शासनाचे आदेश आहे. त्यानंतरही या बर्फाचा बाजारात विक्री होत आहे. हे एक गूढच आहे.
अध्यादेशाची १ जूनपासून अंमलबजावणी होणार असल्यामुळे खाद्य बर्फ तयार करण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासन विभागाचा तसा परवाना आणि निकषाचे पालन करावे लागणार आहे.
बर्फ कारखान्यांची तपासणी
अखाद्य बर्फ विक्रीच्या संदर्भात उन्हाळ्यात बर्फ कारखान्यांची तपासणी केली आहे. शासनाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी १ जूनपासून होणार आहे. कारखान्यांना उपकरणांच्या बदलांसाठी बराच अवधी मिळाला आहे. शासनाच्या आदेशाचे कारखान्यांनी पालन करावे. निळसर रंगाच्या बर्फसंदर्भात १ जूनपासून तपासणी व कारवाई करणार आहे.
मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त,
अन्न व औषध प्रशासन विभाग.