आता रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:44 PM2018-08-30T23:44:15+5:302018-08-30T23:46:12+5:30
रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात राज्यभरात महावितरणच्या वतीने १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार असून यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाऱ्या कंपनीविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात राज्यभरात महावितरणच्या वतीने १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार असून यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाऱ्या कंपनीविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
महावितरणच्यावतीने वीजचोरी रोखण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. परंतु अलीकडच्या काही वर्षात रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत मुंबईत ३० आॅगस्ट २०१८ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अशा वीजचोरीच्या विरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोहीम १ सप्टेंबरपासून राज्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत रिमोटद्वारे वीज चोरी करणारे ग्राहक तसेच संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी. अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रक्कमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरूपात बक्षीस म्हणून देण्यात येते. तसेच अशी माहिती देणाºयाचे नावदेखील गुप्त ठेवण्यात येते. त्यामुळे अशा वीजचोरीची माहिती देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.