नागपुरात ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:28 AM2018-08-28T00:28:47+5:302018-08-28T00:29:48+5:30
गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी तसेच शहर पोलिसांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ असे या उपक्रमाचे नाव असून, सोमवारी सकाळपासून या उपक्रमाची शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात एकसाथ सुरुवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी तसेच शहर पोलिसांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ असे या उपक्रमाचे नाव असून, सोमवारी सकाळपासून या उपक्रमाची शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात एकसाथ सुरुवात झाली आहे.
२७ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर २०१८ असे सलग १५ दिवस प्रायोगिक तत्त्वावर ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ चालविले जाणार आहे. त्यानुसार, शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला रोज त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागणार आहे. ठाणेदाराने त्यांच्या सहकाऱ्यामार्फत किती गुन्हेगारांची तपासणी केली. त्यातील खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, लुटमार, चेनस्नॅचिंग, वाहनचोरी, एटीएम, घरफोडी करणारे गुन्हेगार किती तपासले. त्यांच्याकडून किंवा दुसऱ्या नवीन गुन्हेगारांकडून किती शस्त्रे जप्त केली, त्यांच्यावर काय प्रतिबंधात्मक कारवाई केली, याचा अहवाल तयार करावा लागणार आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सध्या कुठे राहत आहेत, ते काय करतात, त्याचीही माहिती रोजच्या रोज सर्व वरिष्ठांना सादर करावी लागणार आहे.
ठाणेदारांनी केलेल्या कारवाईचा अहवाल डीसीपी, गुन्हे शाखेसह पोलीस नियंत्रण कक्षाला देणेही बंधनकारक आहे. ठाणेदारांनी तयार केलेल्या गुन्हेगार तपासणीच्या अहवालाची एसीपी, डीसीपींना त्यांच्या परिमंडळनिहाय शहानिशा करावी लागणार आहे.
गुन्हेगारी नियंत्रणाची अपेक्षा
‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ उपक्रमांतर्गत रोजच गुन्हेगार तपासले जातील. गुन्हेगारांवर पोलिसांकडून रोजच नजर ठेवली जाणार असल्यामुळे गुन्हेगारांवर जरब राहील. त्यांना उपद्रव करण्यास संधी मिळणार नाही. पोलिसांचा धाक वाढेल. अर्थात शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यात यश येईल, अशी यामागे पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांची कल्पना आहे.
यापूर्वीचे सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी शहरातील गुन्हेगार त्यांच्या घरीच आहे की आणखी कुठे, ते शोधून काढण्यासाठी पोलिसांना रोज टास्क देणे सुरू केले होते. त्यानुसार, आज कोणता गुन्हेगार कुठे आहे, त्याची माहिती काढून त्याच्यासोबत सेल्फी काढायची आणि ती वरिष्ठांना पाठविण्याचे निर्देश प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलिसांना देण्यात आले होते. या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते, हे विशेष!