आॅपरेशन : गुन्हेगारांचे अन् पोलिसांचे
By admin | Published: May 15, 2015 02:42 AM2015-05-15T02:42:42+5:302015-05-15T02:42:42+5:30
कारागृहातून पळून जाण्याचा कट अमलात आणल्याच्या काही तासातच सत्येंद्र गुप्ता, शिबू खान, प्रेम ऊर्फ नेपाली खत्री, बिशनसिंग उके आणि गोलू ऊर्फ आकाश ठाकूर आदींनी बैतूलजवळ पोलिसांवर फायरिग केली.
बैतूलजवळ गोळीबार : गुप्ताने केले मोठे कांड, गेम करण्यासाठीच परतले शिबू अन् नेपाली
नागपूर : कारागृहातून पळून जाण्याचा कट अमलात आणल्याच्या काही तासातच सत्येंद्र गुप्ता, शिबू खान, प्रेम ऊर्फ नेपाली खत्री, बिशनसिंग उके आणि गोलू ऊर्फ आकाश ठाकूर आदींनी बैतूलजवळ पोलिसांवर फायरिग केली. त्यानंतर पुन्हा सत्येंद्र गुप्ताने एक मोठा गुन्हा केला तर, गुरुवारी पोलिसांच्या सापळ्यात अडकलेला शिबू आणि नेपाली हे मोठा गेम करण्याच्या तयारीतच उपराजधानीकडे परतले होते, अशी खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
कारागृहाची सुरक्षा यंत्रणा भेदून उपरोक्त आरोपी कारागृहातून मध्यप्रदेशातील बैतूलला गेले. तेथे त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहून एक पोलीस हवालदार त्यांच्याकडे आला. तो पकडणार हे लक्षात येताच सत्येंद्र आणि शिबूच्या साथीदारांनी त्या पोलीस हवालदारावर गोळीबार केला. त्यानंतर बैतुल, भोपाळ, छिंदवाडा, झाशी, कानपूरसह ठिकठिकाणी हे फिरत होते. या दरम्यान सत्येंद्र गुप्ताने एक मोठा गुन्हा करून रक्कम लुटली. तो तसेच बिशन उके आणि गोलू ठाकूर दुसरीकडे पळाले तर, शिबू आणि नेपाली दुसरीकडे पळाले. ओळखीच्या ठिकठिकाणच्या गुन्हेगारांकडे त्यांनी आश्रय घेतला. शिबू आणि सलिमकडे पैसे नसल्यामुळे अस्वस्थ होते. पोलिसांनी त्यांच्यावर एका गुन्हेगाराच्या मदतीने जाळे फेकले. ‘बडा गेम है. लाखो मिलेंगे‘ म्हणत त्याला नागपूरला बोलविले. पैसे मिळणार आणि नातेवाईकांनाही भेटू‘ अशा दुहेरी हेतूने शिबू नेपालीसह कोराडीच्या बोखाराजवळ परतला. गेम करण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारीनेच नागपूरकडे धाव घेतली. दुसरीकडे त्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी गुन्हेशाखेच्या उपायुक्त मासिरकर यांनी निवडक साथीदारांना सोबत घेत बुधवारी रात्रीपासून आॅपरेशन सुरू केले. कुठे जाणार, कशासाठी जाणार, त्याची कोणत्याच पोलीस कर्मचाऱ्याला माहिती नव्हती. अत्यंत गोपनीय पध्दतीने रात्रीपासून ‘आॅपरेशन‘ सुरू झाले अन् शिबू, नेपाली तसेच अरमानच्या अटकेच्या रूपाने पोलिसांचे आॅपरेशन गुरुवारी सकाळी यशस्वी झाले. या सर्व प्रकारात उपायुक्त दीपाली मासिरकर यांची भूमिका प्रशंसनीय आहे. (प्रतिनिधी)