ऑपरेशन नन्हे फरिश्ते: घरून पळून गेलेल्या १०६४ अल्पवयीन मुलांची आरपीएफकडून घरवापसी
By नरेश डोंगरे | Published: April 8, 2024 03:16 PM2024-04-08T15:16:49+5:302024-04-08T15:17:06+5:30
नागपूर विभागात १५४ मुले-मुली पुन्हा पोहोचली स्वत:च्या कुटुंबीयांमध्ये
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भविष्याचा विचार न करता लावून वेगवेगळ्या कारणांमुळे किंवा आमिषामुळे घरून पळून जाणाऱ्या १०५४ अल्पवयीन मुलामुलींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्याची प्रशंसनीय कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) बजावली आहे.
पाहिजे तसे घरच्यांकडून मिळत नाही, घरातील मंडळी नेहमी टोकतात, नेहमी भांडणं होतात त्याला कंटाळून अनेक अल्पवयीन मुले घर सोडतात. काहींना महानगराची चमकदमक तर काहींना ग्लॅमरचे आकर्षण असल्याने घरून पळ काढतात. तर, काही जणांना फूस लावून आमिष दाखवून पळवून नेले जाते. अशी मुले रेल्वे स्थानकावर दिसताच त्यांना विश्वासात घेऊन आरपीएफकडून विचारपूस केली जाते. त्यांच्या समस्या जाणून घेतले जातात. त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांची चूक लक्षात आणून देत त्यांना त्यांच्या भूमीकेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पनाही दिली जाते. त्याचे अशा पद्दतीने मतपरिवर्तन करून त्या मुला-मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना बोलवून घेतले जाते आणि त्यांच्या स्वाधिन त्यांची मुले केली जातात. यासाठी आरपीएफकडून चाईल्ड लाईन या स्वयंसेवी संस्थेचीही मदत घेतली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला आरपीएफने 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' असे नाव दिले आहे.
हे ऑपरेशन राबविण्यासाठी आरपीएफच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण दिले जाते. मध्य रेल्वेच्या आरपीएफने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षभराच्या कालावधीत ठिकठिकाणी ऑपरेशन नन्हे फरिश्ते राबवून १०६४ मुला-मुलींना त्यांच्या कुटुंबियांत पोहचविण्याची कामगिरी बजावली आहे.
विभागनिहाय कारवाईचा आलेख
'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात आरपीएफने सर्वाधिक ३१३ मुला-मुलींची सुटका केली. मुंबई विभागात आरपीएफने ३१२ मुला-मुलींची, पुणे विभागात २१०, नागपूर विभागात १५४ तर, सोलापूर विभागात ७५ मुला-मुलींची आरपीएफने सुखरूप घरवापसी केली.