ऑपरेशन नन्हे फरिश्ते : गावाचा उंबरठा ओलांडणाऱ्या ६७ मुलांची सुखरूप घरवापसी

By नरेश डोंगरे | Published: June 16, 2024 08:26 PM2024-06-16T20:26:42+5:302024-06-16T20:27:10+5:30

पाच महिन्यांत आरपीएफची कामगिरी

Operation Nanhe Farishte: Safe return home of 67 children who crossed the threshold of the village | ऑपरेशन नन्हे फरिश्ते : गावाचा उंबरठा ओलांडणाऱ्या ६७ मुलांची सुखरूप घरवापसी

ऑपरेशन नन्हे फरिश्ते : गावाचा उंबरठा ओलांडणाऱ्या ६७ मुलांची सुखरूप घरवापसी

नागपूर: रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या चार महिन्यांत ऑपरेशन नन्हे फरिश्तेअंतर्गत वेगवेगळ्या कारणांमुळे गावचा उंबरठा ओलांडणाऱ्या ६७ मुलांची घरवापसी केली. काैटुंबिक समस्या, घरगुती वाद, अल्पवयीन प्रेमप्रकरण, गरिबी, कुणी दाखविलेले आमिष आणि अशाच वेगवेगळ्या कारणांमुळे अल्पवयीन मुले घरून पळून जातात. कुठे तरी मोठ्या शहरात जायचे आणि फिल्मी स्टाइलने जगायचे, असे स्वप्न घेऊन ही मुले घराचा, गावाचा उंबरठा ओलांडतात. मात्र, ऐशआरामाचे जीवन कसे जगणार, कुठे राहणार, त्याची कसलीही तजवीज त्यांच्याकडे नसते आणि त्यांना बाहेर पडल्यानंतर कोणते संकट झेलावे लागणार, त्याचीदेखील कल्पना नसते.

घरच्यांच्या रोकटोकीपासून, कटकटीपासून दूर जायचे आणि मस्त मजा करायची, अशी त्यांची भाबडी कल्पना असते. त्यामुळे ते घर सोडून पळून जातात. लांबचा प्रवास म्हटला की रेल्वेगाडीने करायचा. पैसे असो नसो, तिकीट नाही काढली तरी गर्दीत माहिती पडणार नाही, असाही अनेकांचा गैरसमज असतो. त्यामुळे ते रेल्वे स्थानक गाठतात.

मात्र, अशा घरून पळून आलेल्या अल्पवयीन मुलांना हेरण्याचे खास प्रशिक्षण आरपीएफच्या जवानांना मिळालेले असते. हे प्रशिक्षित जवान आरपीएफकडून वर्षभर नन्हे फरिश्ते नामक ऑपरेशन राबवितात. घरून पळून जाणाऱ्या किंवा कुणी फूस लावून पळवून नेण्याच्या तयारीत असलेल्यांना ते रेल्वे स्थानक आणि परिसरात हेरतात. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस करतात आणि नंतर त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देतात.

गेल्या १ जानेवारी ते ३१ मे २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत अशा प्रकारे घरून पळून आलेल्या ठिकठिकाणच्या ६७ मुला-मुलींना आरपीएफने ताब्यात घेतले. त्यांची चाैकशी करून समुपदेशन केल्यानंतर त्यांच्या पालकांशी संपर्क साधून या मुलांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: Operation Nanhe Farishte: Safe return home of 67 children who crossed the threshold of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर