नागपुरात ऑपरेशन सर्चऑऊट; गुंडाकडून डझनभर तलवारी, दोन पिस्तुले, ८ काडतुसे, भाले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 06:35 PM2022-11-29T18:35:28+5:302022-11-29T18:38:29+5:30
पाचपावलीत बकरीच्या गोठ्यात लपविली होती शस्त्रे; कारागृहातून बाहेर आल्यावर शोधत होते गुन्ह्याची संधी
नागपूर : कारागृहातून बाहेर येताच शस्त्रांची तस्करी करून मोठी घटना घडविण्याच्या इराद्याने संधी शोधणाऱ्या गुंडांना पोलिसांनी शस्त्रांसह रंगेहाथ पकडले. प्रतिस्पर्धी तरुणाला पिस्तुलीचा धाक दाखवून धमकावल्याने ही बाब समोर आली आहे. गुन्हेगारांकडून दोन पिस्तुली, ८ काडतुसे आणि डझनभर तलवारी व भाले जप्त करण्यात आले आहेत.
अभय अजय हजारे (२२, रा.बाळाभाऊ पेठ, पाचपावली) आणि शशांक सुनील समुंद्रे (२३, पाचपावली) अशी आरोपींची नावे आहेत. अभयवर १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो पाचपावलीचा कुख्यात गुंड आहे. एमपीडीएअंतर्गत त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. २४ सप्टेंबर रोजी एमपीडीए संपल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली. तेव्हापासून अभय त्याच्या साथीदारांच्या मदतीने शस्त्रास्त्रांची तस्करी करून मोठी गुन्हेगारी घटना घडविण्याचा कट रचत होता.
दोन दिवसांपूर्वी त्याने साथीदारांच्या मदतीने पाचपावली येथील एका तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. पळून गेल्याने तरुणाचा जीव वाचला. गुन्हेगारांमध्ये या बातमीची चर्चा असल्याने पाचपावली पोलिसांनाही सुगावा लागला. अभयचा साथीदार शशांक समुद्रे याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्याच्या घराची झडती घेतली असता, सुरुवातीला काही आढळले नाही. त्यानंतर पिस्तुली, आठ जिवंत काडतुसे, डझनभर तलवारी, चाकू, भाले सापडले.
आरोपींकडून दिशाभूल
अभयने त्याचा सहकारी शशांकला काही दिवसांअगोदर ही शस्त्रे दिली होती. त्यानंतर, शशांकने त्याच्या घरात असलेल्या बकऱ्यांच्या गोठ्याच्या आत लाल रंगाची पिशवी व नायलॉनच्या पोत्यात शस्त्रे लपविली होती. शशांकच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अभयचा शोध सुरू केला. तो दुचाकीवरून जात असताना सापडला. त्याच्याजवळ एक पिस्तूलही सापडले. जप्त केलेल्या पिस्तूल आणि इतर शस्त्रास्त्रांबाबत तो दिशाभूल करणारी माहिती देत आहे.