उपराजधानीत ‘ऑपरेशन थर्ड आय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 11:23 AM2020-02-15T11:23:36+5:302020-02-15T11:24:44+5:30
गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी आणि गुन्ह्यांचा छडा तत्परतेने लावण्यासाठी शहर पोलिसांनी उपराजधानीत ऑपरेशन थर्ड आय सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत नागपुरात तीन लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आपले नेटवर्क प्रशस्त करण्याचा पोलिसांचा संकल्प आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी आणि गुन्ह्यांचा छडा तत्परतेने लावण्यासाठी शहर पोलिसांनी उपराजधानीत ऑपरेशन थर्ड आय सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत नागपुरात तीन लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आपले नेटवर्क प्रशस्त करण्याचा पोलिसांचा संकल्प आहे.
गुन्हेगारांना सतत नजरकैदेत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चांगली मदत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गुन्ह्यांना आळा घालता येतो आणि गुन्ह्यांची उकल करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होतो. हिवाळी अधिवेशन, मोर्चे तसेच मोठ्या सभा-संमेलने आणि धार्मिक सणोत्सवातही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा चांगला उपयोग होतो.
स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे नागपुरात ३६०० कॅमेरे आहेत तर खासगी कॅमेऱ्यांची संख्या ५० हजार एवढी आहे. मात्र, झपाट्याने वाढणाऱ्या नागपुरातील गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता कॅमेऱ्यांची ही संख्या खूपच कमी आहे. गुन्हेगारांना सतत नजरकैदेत ठेवण्यासाठी किमान ३ लाख कॅमेरे शहरात असावेत, असे पोलिसांना वाटते आहे. अर्थात् प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० हजार कॅमेरे असणे गरजेचे आहे. म्हणून पोलिसांनी व्यापारी प्रतिष्ठाने तसेच खासगी व्यक्तींसोबत चर्चा करून त्यांना त्यांच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची विनंती केली आहे. गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठा आणि संवेदनशील स्थळे, वस्त्यांमध्ये कॅमेऱ्यांचे जाळे असले तर तेथील घडामोडींचा पोलिसांना नेमका वेध घेता येईल. त्यातून अप्रिय घटना टाळता येतील. गुन्हेगारी नियंत्रित करण्यासोबतच झालेल्या गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्यासाठीही पोलिसांना मदत होईल. ३ महिन्यांच्या आत शहरात ३ लाख कॅमेरे बसविण्याचा पोलिसांचा संकल्प असून, ३ महिन्यात हे मिशन पूर्णत्वास नेण्याची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची कल्पना आहे.
अप्रिय घटना टाळता येतात : डॉ. उपाध्याय
उपराजधानीला सुरक्षेचे कवच देण्याच्या प्रयत्नांपैकी एक म्हणजे ‘ऑपरेशन थर्ड आय’ होय, असे पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय म्हणतात. नागपुरातील नागरिक नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देतात. आपण ही कल्पना मांडताच नागपूरकरांनी उस्फूर्त प्रतिसाद देणे सुरू केले आहे. स्वत:हून अनेकांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मोहीम चालविण्यासाठी पुढाकार घेण्याचीही तयारी दाखविली आहे. त्यामुळे ऑपरेशन थर्ड आय लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास डॉ. उपाध्याय यांनी लोकमतजवळ व्यक्त केला.