गुन्हेगारांच्या सफायासाठी ‘आॅपरेशन वाईप आऊट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 10:17 IST2018-10-03T10:14:37+5:302018-10-03T10:17:11+5:30
उपराजधानीतील गुन्हेगारीचा सफाया करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी कर्तव्यकठोर पवित्रा घेतला.

गुन्हेगारांच्या सफायासाठी ‘आॅपरेशन वाईप आऊट’
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील गुन्हेगारीचा सफाया करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी कर्तव्यकठोर पवित्रा घेतला. त्यांनी अवैध धंदे करणारे, गुन्हेगार आणि त्यांना पाठीशी घालून खाबूगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडवून देणारा आदेश जारी केला. सात दिवसात तुमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणारे सर्व अवैध धंदे बंद करा. त्यासाठी अवैध धंदे चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा. आठव्या दिवशी ज्या कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदा सुरू दिसेल, त्या पोलीस ठाण्यातील ठाणेदारावरही कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद केले आहे. पोलीस आयुक्तांनी या आदेशाला ‘आॅपरेशन वाईप आऊट‘ असे नाव दिले आहे. आज सायंकाळी जारी झालेले हे आदेश शहरातील एखाद-दोन वगळता सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण करणारे ठरले आहे. गुन्हेगारीचे मूळ अवैध धंद्यात आहे. गुन्हेगार अवैध दारू विक्री, जुगार अड्डा, मटका अड्डा, चोरीच्या मालाची विक्री, वेश्याव्यवसाय, अवैध सावकारी, खंडणी वसुली करतात. यातून मोठी रक्कम मिळवून गुन्हेगार आपली आर्थिक स्थिती मजबूत करतात. सोबतच या अवैध धंद्यात झोपडपट्टीतील गरिबांच्या मुलांना गुंतवून त्यांनाही गुन्हेगारीत सहभागी करून घेतात. सराईत गुन्हेगार या अल्पवयीन आणि गरीब मुलांकडून अवैध धंदे करवून घेत त्यांना बालवयातच गुन्हेगारीचे धडे देतात. मोठी रक्कम हाताशी असल्यामुळे गुन्हे करताना सापडले तर ते पैशाच्या जोरावर चांगले वकील उभे करून कायद्यातून पळवाटा काढत स्वत:ची सोडवणूक करून घेतात. अशा प्रकारे अवैध धंदे, गुन्हेगारी करूनही त्याचे काही बिघडत नाही, असा वाईट मेसेज गुन्हेगारीच्या वाटेवर असलेल्यांमध्ये जातो. त्यामुळे दुसऱ्या गुन्हेगारांचीही हिंमत वाढते. परिणामी तेदेखील मोठे गुन्हे करतात. त्यामुळे गुन्ह्यांसोबत गुन्हेगारांचीही संख्या वाढते. त्याचा सरळ परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेची घडी बिघडविण्यावर होतो. शहरात गुन्हेगारी वाढल्याची ओरड होते. त्यातून सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ होतात आणि पोलिसांचीही प्रतिमा मलीन होते. अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याने आणि गुन्हेगारी उफाळल्याने संबंधित शहराबद्दल बाहेरच्या व्यक्तींमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हा एकूणच प्रकार शहराच्या आणि शहरातील नागरिकांच्या हिताला बाधा पोहोचविणारा आहे. ते लक्षात घेऊन शहरातील सर्वच्यासर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी यापूर्वी वारंवार ठाणेदारांना सूचना केल्या आहेत. तरीसुद्धा एखाद दोन वगळता प्रत्येकच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्याची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील सर्व पोलीस उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त आणि सर्व ठाणेदारांना एक सूचनावजा आदेश जारी केला आहे. आॅपरेशन हाईप आऊटअंतर्गत जारी झालेल्या या आदेशात ३ आॅक्टोबर ते १० आॅक्टोबर या सात दिवसात तुमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद झाले पाहिजे. ११ आॅक्टोबरपासून धडक मोहीम हाती घेतली जाईल. ज्या कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू गाळणे, विकणे, दारूची वाहतूक करणे, सट्टा-मटका अड्डा, जुगार अड्डा अथवा बुकी आढळल्यास त्या गुन्हेगारासोबतच संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाºयावर कारवाई केली जाईल.
मुळावरच घाव घालायचाय
वरवरची कमाई नको आहे. गुन्हेगारीचे मूळ अवैध धंद्यात आहे. अवैध धंद्यांमुळेच गुन्हेगार गब्बर बनतात. त्यामुळे गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी मुळावरच घाव घालण्याची गरज आहे. ते लक्षआत घेऊनच आॅपरेशन वाईप आऊट हाती घेण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना दिली.