आॅपरेशन याकूबला वेग

By admin | Published: July 19, 2015 02:53 AM2015-07-19T02:53:43+5:302015-07-19T02:53:43+5:30

फास आवळण्याची जोरदार तयारी नवीन डॉक्टरांचे पथक प्रकृतीची नियमित होणार तपासणी

Operation Yakub Velocity | आॅपरेशन याकूबला वेग

आॅपरेशन याकूबला वेग

Next

लोकमत विशेष

नरेश डोंगरे नागपूर
मुंबईतील भीषण बॉम्बस्फोटाच्या मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीचा फास आवळण्याची उच्चस्तरावरून जोरदार तयारी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आरोग्य यंत्रणेला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नवीन पथक पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे. अ वर्गाचा वैद्यकीय अधिकारी अन् मनोविकार तज्ज्ञाचाही या पथकात समावेश राहणार असून, या पथकाच्या जबाबदारीबाबत शुक्रवारी संबंधित उच्चाधिकाऱ्यांची प्रदीर्घ बैठक झाल्याची खास सूत्रांची माहिती आहे.
याकूब मेमन याला ३० जुलैला फाशी होणार असल्याची माहिती प्रसार माध्यमातून उघड झाल्यापासून कारागृह प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमधील हालचाली अधिकच गतिमान झाल्या आहेत. डेथ वॉरंट निघाल्याची माहिती याकूबसह त्याच्या नातेवाईकांनाही कारागृह प्रशासनाने कळविली आहे. यामुळे याकूब कमालीचा अस्वस्थ आहे.
कारागृहाच्या सूत्रानुसार, याकूब एका विशिष्ट आजाराने ग्रस्त आहे. मात्र, तो कधीच चिडचिड करीत नाही. कारागृहातील कर्मचाऱ्यांसोबतच संपर्कात आलेल्या प्रत्येकाशी तो शांत आणि नम्रपणे वागतो. मात्र, फाशीच्या तयारीचे संकेत मिळाल्यापासून त्याची अस्वस्थता तीव्र झाली आहे. कारागृहाच्या आत इस्पितळ आहे.
तेथे डॉक्टरही आहे. मात्र, ब वर्गाचा (बीएएमएस) डॉक्टर अन् नेहमी सुट्यांवर जाणारे इतर वैद्यकीय कर्मचारी अशा संवेदनशील रुग्णाला हाताळण्यासाठी पुरेसे नाही. देशविदेशात याकूबच्या शिक्षेची तारीख (अंदाजे) जाहीर झाल्यानंतर याकूबच्या प्रकृतीला काही झाले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा गहजब होऊ शकतो, हे लक्षात घेता याकूबच्या प्रकृतीची काळजी घेण्याच्या खास सूचना उच्चस्तरावरून देण्यात आल्याची माहिती आहे.
याकूबची दिनचर्या
कारागृह अधिकाऱ्यांकडून शिक्षेच्या अंमलबजावणीचे संकेत मिळाल्यापासून अस्वस्थ झालेल्या याकूबने आपल्या दिनचर्येत मात्र विशेष बदल केलेला नाही. तो भल्या सकाळी उठतो. नमाज अदा करतो. कुराण आणि चांगली काही पुस्तके त्याने मागवून घेतली आहे. त्या आधारे तो फाशी यार्डात दिवस काढतो आहे.
कारागृहात सध्या एकच वैद्यकीय ंअधिकारी आहे. त्यामुळे पुन्हा एक नवीन वैद्यकीय अधिकारी देण्याचे ठरले आहे. मनोविकार तज्ज्ञाचीही व्हीजिट राहणार आहे. कुणाला काय हवे, काय नको, त्याची तपासणी करून तसा औषधोपचार केला जाईल. सोमवारपासून डॉक्टर कार्यरत होतील. याकूबच्या संदर्भात आपल्याला काही माहीत नाही. कारागृह प्रशासनाचे पथक कार्यालयात आले असेल तर आपली त्यांच्याशी भेट झाली नाही. कारण आपण शुक्रवारी एका बैठकीत होतो.
- डॉ. संजीव जयस्वाल
आरोग्य उपसंचालक, नागपूर.

Web Title: Operation Yakub Velocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.